
मराठी साहित्याला आपल्या तरल, चित्रमय आणि आशयगर्भ लेखनाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी (वय 92) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने कराडसह संपूर्ण मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून, एका संवेदनशील शब्दचित्रकाराचा अंत झाल्याची भावना साहित्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या औदुंबर येथे 20 नोव्हेंबर 1936 रोजी जन्मलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांच्यावर घरातील चित्रकलेचा वारसा होता. त्यांचे आजोबा आणि वडील हे चित्रकार असल्याने शब्दांतून जिवंत चित्रे उभी करण्याची विलक्षण ताकद त्यांच्या लेखणीत निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात त्यांनी साइनबोर्ड पेंटिंग तसेच ओगलेवाडी येथील कारखान्यात नोकरी करत साहित्यसाधना सुरू ठेवली. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. कराड येथील 76 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
1965 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘डोह’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ या ललित लेखसंग्रहांद्वारे त्यांनी मराठी वाचकांच्या मनावर छाप उमटवली. मराठी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर होऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.





























































