
मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन, डिजिटल शिक्षणाची सुविधा यांसह विविध शैक्षणिक योजनेद्वारे विद्यार्थ्यांवर अमाप खर्च होत असतानाही शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद ओस पडू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वर्षागणिक घटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांत २३ हजार १०४ विद्यार्थी होते. मात्र २०२६-२७ मध्ये केवळ विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ९५ इतकी झाली आहे. अवघ्या सहा वर्षांत तब्बल ४ हजार ६ विद्यार्थ्यांची घट झाल्याने या शाळांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहापूर तालुक्यात ४५७ जिल्हा परिषद शाळा असून त्यामध्ये आजमितीस शिक्षण घेणाऱ्या सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक हजार ९२ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र शाळांची संख्या कायम असतानाही विद्यार्थ्यांचा ओघ कमी होत असल्याने अनेक शाळांमधील वर्ग ओस पडत चालले आहेत. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल, कमी होत असलेला जन्मदर, रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि बदलती शैक्षणिक मानसिकता यामुळे जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनिय झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जाही सुधारला आहे. मात्र पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने पटसंख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे.
२०२१-२२ मध्ये ११,७०२ मुले व ११,३९९ मुली असे एकूण २३,१०१ विद्यार्थी होते. त्यानंतर २०२२-२३ मध्ये ही संख्या २२,१८६, २०२३-२४ मध्ये २१,४०७, २०२४-२५ मध्ये २०,३३१, २०२५-२६ मध्ये १९,६१२ आणि चालू वर्षात २०२६-२७ मध्ये ती आणखी घसरून १९,०९५ वर आली आहे. मुलांबरोबरच मुलींच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
शासन दरवर्षी जिल्हा परिषद शाळांसाठी निधी देते. त्यामध्ये शिक्षकांचे वेतन, माध्यान्ह भोजन, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, देखभाल, वीज, डिजिटल शिक्षण, समग्र शिक्षा अभियान याद्वारे विद्यार्थ्यांवर लक्षणीय खर्च होताना दिसत असतानाही पटसंख्या कमी होणे ही चिंतेची बाब आहे.
शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सातत्याने घटणारी पटसंख्या ही केवळ आकड्यांची घसरण नसून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला लागलेली धोक्याची घंटा आहे. ही घसरण रोखण्यासाठी शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधी आणि पालक यांनी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू
जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी शाळा पूर्वतयारी, प्रवेशोत्सव, गुणवत्ता विकास, डिजिटल शिक्षण आणि विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. पटसंख्या वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांनी सांगितले.




























































