चंदा चोर अयोध्या छोड, राम मंदिर लुटीविरोधात साधू-संत आक्रमक; चंपत राय यांच्या विरोधातील बैठक पोलिसांनी रोखल्याने संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी चोरीवरून देशातील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू-संत प्रचंड आक्रमक झाले आहेत. मंदिर लुटीचे हे प्रकरण आणि त्यातील चंपत राय यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी साधूंनी आज अयोध्येत बैठक आयोजित केली होती. ही बैठक पोलिसांनी रोखल्यामुळे साधूंच्या संतापाचा उद्रेक झाला. बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडत त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले. चंदा चोर, अयोध्या छोड… अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

राम मंदिर लुटीमुळे देशभरात रोष आहे. रामाचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या जवळच्या लोकांचा लुटीत सहभाग असल्याने तमाम रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची प्रमुख जबाबदारी चंपत राय यांच्यावर होती. मात्र, उत्तर प्रदेश सरकारच्या एसआयटी चौकशीत साधा त्यांचा उल्लेखही नाही. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रकाशानंदगिरी ऊर्फ कम्पुटर बाबा यांनी साधूसंतांची बैठक बोलावली (पान 1 वरून)  होती. अयोध्येतील कारसेवकपुरमजवळच्या ओम आश्रमात ही बैठक सुरू झाली. बैठकीला महंत जानकीघाट बडा स्थानचे महंत जन्मेजय शरण, महामंडलेश्वर परमानंद गिरी, महंत दिलीप दास यांच्यासह आठ ते दहा प्रमुख संत उपस्थित होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच तिथे मोठय़ा संख्येने पोलीस आले. त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना बाहेर काढले. त्यानंतर संतांनाही आश्रमाबाहेर काढून दाराला कुलूप लावले. या सर्वांना काही वेळ नजरकैदेत ठेवण्यात आले.

निष्पक्ष चौकशीसाठी आंदोलन करणार

‘देणगी चोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. ती मान्य व्हावी यासाठी संत समाज मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा कम्प्युटर बाबांनी यावेळी दिला. ‘गरज पडल्यास एक लाखाहून अधिक संतांना आंदोलनासाठी अयोध्येत बोलावले जाईल. रामलल्लाचे दर्शन घेऊन सर्व संत भगवान श्रीरामांची क्षमा मागतील,’ असे ते म्हणाले, तर आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे. देणगी चोरीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भूमिका असलेल्यांपर्यंतही पोहोचले पाहिजे, अशी मागणी महामंडलेश्वर परमानंद गिरी यांनी केली.

मोठ्या आरोपींना वाचवले जातेय!

पोलिसांच्या या मनमानीमुळे संतापलेल्या साधूसंतांनी आश्रमाच्या बाहेर पडताच घोषणाबाजी केली. ‘देणगी चोरीच्या प्रकरणात छोटय़ा आरोपींवर कारवाई करण्यात आली, पण मोठय़ा आरोपींना वाचवले जात आहे. जिल्हा प्रशासन आरोपींना साथ देत आहे. म्हणूनच संतांची बैठक होऊ दिली जात नाही’, असा आरोप संतांनी केला.