नाफेड, एनसीसीएफने नाशिकच्या शेतकऱ्यांना डावलून परराज्यातून खरेदी केलेला सडका कांदा दिल्लीला पाठवण्याचा घाट घातला, ही लासलगावहून रवाना होणारी एक्प्रेस बुधवारी अडवून शिवसेना, प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. कांद्याचे भाव पाडून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळला, संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, तासाभराच्या आंदोलनानंतर पोलीस बंदोबस्तात ही गाडी रवाना करण्यात आली.
दोन दिवसांपासून लासलगाव स्थानकात ही एक्प्रेस दाखल झाली होती, त्यात कालपासून नाफेड-एनसीसीएफकडील कांदा भरण्याचे काम सुरू होते. हा मध्यप्रदेशातून खरेदी केलेला सडका कांदा असल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील-सुरासे, प्रहारचे गणेश निंबाळकर व शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला. आतील कांदा कुठल्या दर्जाचा आहे, ते आम्हाला दाखवा, सडका कांदा पाठवून नाशिक जिह्यातील शेतकऱ्यांची नाचक्की करू नका, असे आवाहन करीत आंदोलकांनी दुपारी दीड वाजता रेल्वेरूळावर उतरून एक्प्रेससमोर घोषणाबाजी केली. चांगला कांदा पाठवत असाल, तर आमची हरकत नाही. मात्र, शेतकऱ्यांना डावलून काही संस्थांमार्फत परराज्यातून आणलेला खराब दर्जाचा, आकाराने लहान व सडका कांदा पाठवू नका, असा पवित्रा घेवून एनसीसीएफ, केंद्रीय वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तब्बल तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे रेल्वे व लासलगाव पोलिसांची एकच धावपळ उडाली. या आंदोलनात उत्तमराव वाघ, अभिजित भंडारी, प्रकाश चव्हाण आदी सहभागी होते. आंदोलकांना बाजूला केल्यानंतर दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली.
शेतकरी, ग्राहक दोघांचीही फसवणूक
नाफेड, एनसीसीएफ शेतकऱ्यांऐवजी सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींच्या कंपन्यांकडून कांदा खरेदी करते. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सडका कांदा पाठवून ग्राहकांनाही फसवले जात आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, संबंधित कंपन्यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शिवा पाटील-सुरासे यांनी केली आहे.
कमी कांदा पाठवला
सुमारे 840 मेट्रिक टन कांदा पाठवला जाणार होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक बोगींमध्ये क्षमतेपेक्षा कमी माल भरला गेला, सुमारे साठ टक्के जागा रिकामीच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
खरेदीत मोठा भ्रष्टाचार
शेतकऱ्यांकडून खरेदी करताना गुणवत्तेचे निकष बघून प्रतवारी करून मोजकाच चांगला कांदा घेतला जातो. मग परराज्यातून कमी दर्जाचा, लहान आकाराचा कांदा का घेतला, यात केवळ मोठा भ्रष्टाचार झाला आहे, या खरेदीचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा झाला नाही, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.

































































