सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; बेस्टच्या बैठकीत शिंदे गट-भाजपमध्ये जुंपली, समिती अध्यक्षांना विषयाचे गांभीर्य नसल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सत्ताधाऱयांमधील अंतर्गत मतभेद सोमवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. बेस्ट समितीच्या बैठकीत शिंदे गट आणि भाजपमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू झाले आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. समितीच्या अध्यक्षा असलेल्या शिंदे गटाच्या तृष्णा विश्वासराव यांना विषयाचे गांभीर्यच नसल्याचा आरोप भाजप नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी केला. यावेळी त्यांनी समितीच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आर्थिक वर्ष 2025-26 मधील बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पातील खर्च, लेखापरीक्षण तसेच मंजुरी प्रक्रियेबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपच्या गणाचार्य यांनी थेट शिंदे गटाच्या तृष्णा विश्वासराव यांच्या भूमिकेवर शंका घेतली. अर्थसंकल्पाचा प्रस्ताव आणि विषय समजून न घेणे यावरून तुम्हाला विषयाचे गांभीर्यच नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप गणाचार्य यांनी विश्वासराव यांच्यावर केला. प्रत्येक महिन्याच्या छाननी अहवालावर किमान दोन सदस्यांच्या सह्या असणे आवश्यक आहे. फेब्रुवारीमध्ये समितीची स्थापना झाल्यानंतरही नियमावलीचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याचा मुद्दा गणाचार्य यांनी मांडला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण होताच बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी महापालिकेच्या लेखा विभागामार्फत हिशेब तपासला जातो. लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतरच सदस्यांच्या सह्या घेतल्या जातात. यापुढे प्रत्येक बैठकीत संबंधित माहिती समितीपुढे ठेवली जाईल, असे सेठी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 2025-26 चा अर्थसंकल्प 10 ऑक्टोबर रोजी समितीपुढे सादर केला जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

तूट भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना? – शिवसेनेची आक्रमक भूमिका 

तूट भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या? विद्युत विभागातील वीज विक्रीचे प्रमाण कमी असताना नफा कसा वाढला? तसेच बेस्टच्या स्वमालकीच्या 249 बसेस तोट्यात का धावत आहेत? असे सवाल करत शिवसेनेचे सदस्य नितीन नांदगावकर यांनी तुटीच्या अर्थसंकल्पावरून आक्रमक भूमिका मांडली. त्यावर महाव्यवस्थापक सेठी यांनी, वीजपुरवठा विभागातील उत्पन्न वाढल्यामुळे नफा वाढला आहे. तसेच परिवहन विभागात चालक व वाहकांची संख्या बसच्या तुलनेत अधिक असल्याने मनुष्यबळाचा खर्च वाढत असल्याचे सांगितले.