सिनर्जीया केम इंडस्ट्रीजमधील स्फोटप्रकरणी प्रॉडक्शन मॅनेजर, सुपरवायझर, ऑपरेटरसह 10 जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाड औद्योगिक वसाहतीतील सिनर्जीया केम इंडस्ट्रीज कंपनीत बॉयरलमध्ये रविवारी रात्री झालेल्या स्फोटात सात कामगार जखमी झाले होते. हा स्फोट इतका भयानक होता की चार ते पाच किलोमीटरचा परिसर हादरून गेला होता. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रॉडक्शन मॅनेजर, सुपरवायझर, ऑपरेटरसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीतील सिनर्जीया केम इंडस्ट्रीज कंपनीत पॅरा-नायट्रो क्लोरोबेंझीन हे केमिकल तयार केले जाते. या केमिकलचे उत्पादन सुरू असताना बॉयलरमध्ये अचानक स्फोट झाला होता. नितीन लाड, ऑस्कर फराटे, नंदकिशोर सावंत, सुनील पुरी, पोपीन दल, हर्षद यादव आणि परेश सकपाळ अशी स्फोटातील जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांचा तपास सुरू

प्रॉडक्शन मॅनेजर अनिश राय, सुपरवायझर यश निवगुणे, ऑपरेटर नितीन लाड, अफसर हुसैन, महमद नासीर, मुकेश राजवंशी, विठ्ठल खेडेकर, कणगुले, प्रदीप राम आणि विवेक पड्याळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे तसेच धोकादायक रासायनिक प्रक्रिया सुरू असताना आवश्यक खबरदारी न घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कंपनीत कोणती प्रक्रिया सुरू होती, स्फोटाचे कारण काय होते, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याचा तपास पोलीस करीत आहेत.