SIR घोटाळा हा मतदारांच्या मतांचा अपमान, लोकशाहीला काळीमा- राज ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगातील बंडाळीनंतर संपूर्ण देशभरात SIR चा हा विषय पेटलेला आहे. आजपर्यत झालेल्या आमच्या अपमानाचा हा विषय आहे. यासगळ्यात आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घेत आलो आणि त्याबदल्यात असे घोटाळे पदरी पडणार असतील तर हे लोकाशाहीला काळीमा फासल्यासारखे आहे. हा मतदारांच्या मतांचा अपमान आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. त्याचबरोबर 4 तारखेला होणाऱ्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाच्या रूपरेषेची सविस्तर माहिती दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थार संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता भायखळा ते मुंबई महानगरपालिका असा हा संयुक्त मोर्चा निघेल, त्यानंतर तिथून सभा सुरू होईल. हा निवडणुक आयोगाच्या विरोधातील मोर्चा आहे. गेली अनेक वर्षे या विषयावर आम्ही बोलत आलेलो आहोत. यासंदर्भात 2017-18 ला अनेक नेत्यांसोबत भेटी झाल्या. त्यामुळे आता मोर्चा झाल्यानंतर पुढची रुपरेषा ठरवू, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

निवडूक आयोगाविरोधातील या मोर्चासाठी सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील लोकांना देखील जर या मोर्चात सहभागी व्हायच असेल तर ते येऊ शकतात. हा मोर्चा राजकीय पक्षाविरोधात नसून निवडणूक आयोगाच्या गेल्या काही वर्षातील कारभाराविरोधातील हा मोर्चा आहे. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. या देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांच्या हातात फक्त तिरंगा असेल, असे राज ठाकरे म्हणाले.

 2 तारखेला सीजेपीचा मोर्चा, 4 तारखेला आमचा मोर्चा होईल, त्यापुढेही गोष्टी होतील. अनेक लोकं रस्त्यावर येतील आणि तेव्हाच सरकारला निवडणूक आयोगाला ही गोष्ट समजेल. सगळ्यांचा अजेंडा एकच आहे त्यामुळे तो कोणीही कसाही राबवावा. उद्या एखाद्या हाऊसिंग सोसाईटीने आंदोलन केलं तरी चालेल. त्यामुळे यात कोणताच स्पर्धेचा विषय नाही.

निवडणूक आयोगाच्या आरोपांवर भाजप प्रतिक्रिया देतेय. यावरून राज ठाकरे यांनी भाजपला सुनावले. मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे. विषय निवडणुक आयोगाचा असताना भाजपला का त्रास होतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.