
आज ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट झाली आहे. बीडमध्ये अनेक खून होतात, खून दडवले जातात. तिथे वाल्मिक कराडसारखे लोक निर्माण झाले. त्यांचा पोलिसांवर दबाव होता आणि त्या दबावातून खून, हत्या, दरोडे लपवले गेले. अशा प्रकारची अवस्था सुशिक्षित आणि सुसंस्कृत ठाण्याची झाली आहे. ठाण्याची अवस्था अत्यंत भयंकर असून हे जर देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल तर ते अपयशी गृहमंत्री आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच प्रदीप पूर्णेकर यांच्या खुनामागे 100 टक्के ठाण्यातील स्थानिक राजकीय गट आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. ते गुरुवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
प्रदीप पूर्णेकर यांच्या खुनाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी एफआयआरमध्ये शिंदे गटाच्या महिला नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे, त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचे नाव आले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर यांच्या सात राऊंड फायर झाले. हा राजकीय वादातून झालेला खून आहे. काल पुरवणी एफआयआरमध्ये मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचे नाव आलेले आहे. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि आम्ही तिथे गेलो. पोलीस स्टेशनमध्येही थांबलो आणि पोलीस आयुक्तांनाही भेटलो. त्यावेळी पूर्णेकरांचा मृतदेह पोलीस स्टेशनबाहेर रुग्णवाहिकेत होता. हजारो लोक, शिवसैनिक तिथे उपस्थित होते.
प्रदीप पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी सांगितले की, माजी महापौर मिनाक्षी शिंदे ज्या निलकंठ टॉवरमध्ये राहतात त्या टॉवरमध्ये हल्लेखोरांना जाताना दोन दिवस आधी त्यांनी पाहिले होते. ही खूप महत्त्वाची माहिती असून हत्या झालेले पूर्णेकर यांच्या चिरंजीवाने ती दिलेली आहे. हत्येतील आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांची जवळीक होती. त्या प्रकारची छायाचित्र राम पूर्णेकर यांनी पोलीस स्टेशनला दाखवली. पुरावे आहेत, एफआयआर नोंदवणारे प्रत्यक्षदर्शी आहेत, तरी हा संशय खरा वाटत नाही का? पुरवणी एपआयआरला राम पूर्णेकर यांचा जबाब जोडण्यात आलेला आहे. 100 टक्के या गुन्ह्यामागे एक राजकीय गट आहे आणि तो स्थानिक आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केले पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन
ठाण्यातील ड्रग्ज टोळीविरुद्ध आणि एकनाथ शिंदे आणि बिल्डरांचे ज्या क्लस्टरवर प्रेम आहे त्याविरुद्ध पूर्णेकर यांनी आघाडी उघडली होती. ते अनेक आघाड्यांवर लढत होते. मिनाक्षी शिंदे यांच्याविरुद्ध ते निवडणूकही लढले होते. त्यामुळे यात आपले आणि आपल्या पतीचे नाव का येत आहे याचा मिनाक्षी शिंदे यांनी शांतपणे विचार करावा. शेवटी दादागिरीचा अंत होतो हा देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्रात याआधीही अशी गुंडगिरी, भाईगिरी झाली. ते आज कुठे गेले कुणालाही माहिती नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
ठाण्याचे आमदार संजय केळकर हे सुसंस्कृत पुढारी आहेत. संघाच्या मुशीतून तयार झालेला तो कार्यकर्ता आहे. त्यांनी तरी याविरुद्ध आवाज उठवावा. ठाण्याचे उपमहापौर भाजपचे आहेत. त्यांनी सुद्धा काल पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे आणि पूर्णेकरांच्या खुनाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. आम्ही जिथे बोट दाखवतोय तिथेच त्यांचाही संशय आहे, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच तपास योग्य दिशेने करू आणि कुणालाही सोडणार नाही, असे वचन पोलिसांनी दिले आहे. दोघांना अटक झाली असून हे प्रकरण कोर्टात टिकेल अशा पद्धतीने बनवू असे आश्वासन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.
एका ताटात जेवलास, मग तू असं का केलं पप्प्या… प्रदीप पूर्णेकरांची पत्नी वैजयंती यांचा आक्रोश






























































