दिल्ली पोलिसांनी माझा आणि कुटुंबाचा मानसिक छळ केला; मोदींच्या ‘हुकूमशाही’विरोधातील लढा सुरूच ठेवणार – अभिजीत दिपके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा मानसिक छळ केला. 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वी ताब्यात घेतल्यानंतर आपल्या ठावठिकाणाबाबत कुटुंबीय आणि वकिलांना माहिती देण्यात आली नाही, असा दावा दिपके यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधातील आपला लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिपके यांच्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. ते हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या आपल्या मूळ गावी गेले होते. त्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचल्यावर विमान उतरताच पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. या काळात आपल्या आई-वडिलांना किंवा वकिलांना आपण कुठे आहोत, याची माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.

आजीच्या निधनानंतर तिच्यासोबत असलेल्या चुलत भावाचा संपर्क क्रमांक मिळवण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी मोबाईलमधून तो क्रमांक मिळवण्याची परवानगीही दिली नाही, असे दिपके यांनी सांगितले.
दिपके म्हणाले की, “आजीच्या निधनाची माहिती दिली होती, तर पहाटे 3.30 वाजता पोलिस अटकेची कागदपत्रे घेऊन माझ्याकडे का आले आणि त्यावर सही करण्यास का सांगितले? त्यांनी मला आई-वडिलांशी बोलण्यास सांगितले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या क्षणी त्यांच्याशी बोलू शकत नसल्याचे मी सांगितले. त्यानंतर आजीसोबत असलेल्या माझ्या चुलत भावाला फोन करण्यासाठी त्याचा क्रमांक मागितला. पण पोलिसांनी मोबाईलमधून तो क्रमांक काढण्याचीही परवानगी दिली नाही,” असे दिपके म्हणाले.

आपल्या आजीच्या निधनामुळे कुटुंबीय आधीच दुःखात असताना पोलिसांनी मला आणि माझ्या आई-वडिलांनामानसिक त्रास दिला, असा आरोप त्यांनी केला. “दिल्ली पोलिसांमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना मानसिक छळ सहन करावा लागला,” असे ते म्हणाले.

दिपके यांच्या आरोपांनंतर दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये दिपके यांना आजीच्या निधनाची माहिती देण्यात आली होती आणि अंत्यसंस्कारासाठी गावी जाण्याची व्यवस्था करण्याची मदतही देण्यात आली होती, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, दिपके यांनी ही मदत नाकारल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

दिपके यांनी पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओवर आक्षेप घेतला. हा व्हिडीओ एडिट करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण व्हिडीओ प्रसिद्ध करण्याची मागणी केली.

पोलिसांनी आंदोलनादरम्यान शांतता भंग करणार नाही, अशा आशयाच्या काही कागदपत्रांवर सही करण्यास सांगितल्याचाही त्यांनी आरोप केला. मात्र, वकील उपस्थित नसताना आपण सही करणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे दिपके यांनी सांगितले.

‘मोदींची हुकूमशाही संपेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका करताना दिपके यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. “नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही संपेपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू,” असे ते म्हणाले.