
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक 2026-2031 साठी रविवारी (दि. 18) 35 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तब्बल 5 हजार 418 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, सोमवारी (दि. 19) सकाळी 8 वाजेपासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे 32 टेबलांवर मतमोजणी होणार आहे.
ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमानुसार पार पाडावी, याची प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विजय राठोड यांनी दिल्या आहेत. ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची असून, सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वसाधारण मतदारसंघातून 20 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी 40 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन, तर अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 35 केंद्राध्यक्ष, 210 मतदान अधिकारी आणि 35 शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत.याशिवाय एक राखीव केंद्राध्यक्ष, 30 राखीव मतदान अधिकारी आणि पाच राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे 35 शस्त्र्ाधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मोहिनी चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी युसूफ शेख व प्रेमदास राठोड आदी उपस्थित होते.


























































