
महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या लालपरी अर्थात एसटीची बससेवा ऐन दिवाळीत कोलमडण्याची शक्यता आहे. दिवाळी बोनसबरोबरच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याने एसटी कर्मचाऱयांमध्ये असंतोष वाढला आहे. प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नांवर कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आंदोलन झाल्यास त्याचा फटका एसटी बससेवेला बसण्याची चिन्हे आहेत.
राज्यभरातील 86 हजारांहून अधिक एसटी कामगारांचा हक्काच्या आर्थिक भत्त्यांसाठी संघर्ष सुरूच आहे. एसटी कामगारांना 58 टक्के महागाई भत्ता, 10, 20 आणि 30 टक्के घरभाडे भत्ता तसेच तीन टक्के वार्षिक वेतनवाढीचा दर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल 2016 पासून वेतननिश्चिती करून जुलै 2026 देय ऑगस्टच्या वेतनात वेतनवाढीचा दर लागू करण्यात आला, मात्र महागाई भत्त्याची सन 2018 पासूनची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. तसेच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराची थकबाकीही कर्मचाऱयांना मिळणे बाकी आहे. संबंधित प्रलंबित आर्थिक देयके देण्याबाबत सरकार पातळीवर ठोस हालचाली दिसून येत नसल्याने कर्मचाऱयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचदरम्यान कामगार संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत वेळीच प्रत्यक्ष कार्यवाही न केल्यास ऐन दिवाळीत कर्मचाऱयांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
n परिवहन मंत्र्यांनी जूनमध्ये संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला प्रलंबित आर्थिक देयकांबाबत घोषणा केली होती. थकीत महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्त्याच्या 10 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के दरांनुसार देय असलेल्या फरकाची थकबाकी तसेच वार्षिक वेतनवाढीतील एक टक्का फरकाची रक्कम डिसेंबरपासून अदा करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्याचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी भेट द्या!
राज्य सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे एसटी कर्मचाऱयांना प्रत्येकी 15 हजार रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात यावेत, 12,500 रुपयांची उत्सव अग्रीम रक्कम 31 ऑक्टोबरपूर्वी द्यावी, विविध भत्त्यांची थकीत रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी, ऑक्टोबरचे मासिक वेतन महिनाखेरीपूर्वी देण्यात यावे या प्रमुख मागण्या करीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले आहे.

























































