आरिफ शेखविरुद्ध आणखी दोन मुलींची तक्रार; एसआयटीकडे तपास, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपाऱ्यातील आरिफ शेख याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणीने करतानाच या नराधमाने तब्बल ८० तरुणींना फसवल्याचा दावाही पीडितेने केला. त्यानंतर आरिफविरुद्ध आणखी दोन मुलींनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटीमार्फत तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तपासातून नराधमाने किती मुलींची फसवणूक केली, त्यात कोण सामील आहे, याचा पर्दाफाश होणार आहे.

अवघ्या २२ वर्षांचा आरिफ शेख याच्याशी एका जिममध्ये पीडित तरुणीची ओळख झाली होती. त्याचे रूपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले. आरिफ याने लग्नाचे आश्वासन देऊन अनेकदा अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला होता. या तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

त्यानंतर आरिफ याला अटक केली असून शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरिफच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आणखी दोन तरुणी तक्रारीसाठी पुढे सरसावल्या आणि नालासोपारा पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला असल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.