…तर हिंदुस्थान पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने नवा वाद, विरोधकांनी घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, तर हिंदुस्थान पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील, असे विधान राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी भाजपला घेरले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपवर हल्ला चढवला आहे.

जयपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मदन राठोड यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा संदर्भ दिला. आज अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, तर आपण पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू, कारण तो आपला शेजारी देश आहे. मात्र, आपल्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला, तर आपण आपल्या देशाच्या बाजूने उभे राहतो. हे सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी राठोड यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. पाकिस्तानमुळे हिंदुस्थानी जवान आणि नागरिकांना जीव गमवावा लागतो, अशा देशाच्या बाजूने उभे राहण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, या देशविरोधी विधानावर भाजप काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून उपस्थित केला.

आम आदमी पक्षानेही राठोड यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीका केली. जनतेने प्रश्न विचारले की त्यांना पाकिस्तानी ठरवले जाते, तर तरुणांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना दहशतवादी म्हटले जाते; मग भाजप नेत्यांनी पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याची भाषा केल्यावर भाजपचा राष्ट्रवाद कुठे जातो? असा सवाल आपने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणीही आपने केली.