
रशियाच्या कामचटका द्वीपकल्प 7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला आहे. शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास हा शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 140 किलोमीटर खोल होते. रशियाच्या व्हिल्युचिन्स्क शहरापासून सुमारे 123 किलोमीटर नैऋत्येला हे केंद्र नोंदवले गेले, अशी माहिती युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने दिली आहे.
स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.35 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका निर्माण झालेला नाही, अशी माहिती अमेरिकेच्या ‘नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने दिली. तसेच, या घटनेत झालेली जीवित किंवा वित्तहानीबाबतची माहिती तात्काळ उपलब्ध झालेली नाही.
कामचटका द्वीपकल्प हा भाग भूकंपप्रवण क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यातही या किनाऱ्याजवळ 8.8 तीव्रतेचा महाभूकंप झाला होता. यामुळे आलेल्या त्सुनामीने किनाऱ्याजवळील एका गावाचा काही भाग समुद्रात वाहून गेला होता.
रशियाला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जपानलाही 9.9 तीव्रतेच्या भूकंपाचा इशारा देण्यात आला. या महाभूकंपाच्या इशाऱ्यानंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली. जपानच्या हवामान विभागाने हा इशारा दिला होता. यामुळे संपूर्ण जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र हवामान विभागाच्या अर्ली वॉर्निगं सिस्टीमने केलेली ही चूक असल्याचे जवळपास 12 मिनिटानंतर लक्षात आले.
प्रत्यक्षात जपानच्या यंत्रणेने नोंदवलेली खरी तीव्रता 6.9 ते 7 च्या आसपास होती. 9.9 तीव्रतेच्या या अलार्ममुळे संपूर्ण जपानमध्ये सुमारे 12 मिनिटे प्रचंड घबराट आणि अफरातफरी माजली होती. त्यानंतर जपानच्या हवामान विभागाने आपली चूक लक्षात येताच स्पष्टीकरण दिले आणि या चुकीबद्दल जनतेची माफी मागितली.
दरम्यान, 9.9 तीव्रतेच्या भूकंपाचा इशारा खरा ठरला असता तर जपानमध्ये हाहाकार उडाला असता. याआधी जगभरात नोंदवला गेलेला सर्वात मोठा भूकंप 1960 मध्ये चिली येथील वाल्डिव्हिया भूकंप होता. याची तीव्रता 9.5 इतकी होती.

























































