रणवीर सिंह डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल 

अभिनेता अमीर खानचे डीपफेक प्रकरण ताजे असतानाच आता अभिनेता रणवीर सिंहचादेखील डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

अभिनेता रणवीर सिंह हा काही दिवसांपूर्वी एका फॅशन शोला गेला होता. त्या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सहभागी झाली होती. तसेच त्याने वाराणसी शहराला भेट दिली होती. त्या भेटी दरम्यान त्याने एका वृत्तवहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्या व्हिडीओमधील चलचित्र तसेच ठेऊन आर्टिफिशन इंटेलिजन्स, डेटा स्वपिंग, मशीन लर्निंग, बेस स्पीच ओव्हरचा वापर करून एक डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला.

तो डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा प्रकार लक्षात येताच रणवीर सिंहनेदेखील ट्विटरवर हा प्रकार निदर्शनास आणून दिला. डीपफेक व्हिडीओ प्रकरणी रणवीरच्या वडिलांनी महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या गुह्यात पोलिसांनी एका संशयिताला नोटीस पाठवली आहे.