आम्ही जबाबदार विरोधीपक्ष; याक्षणी आरोपप्रत्यारोपांचं राजकारण करण्यापेक्षा धीर देणं महत्त्वाचं! आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

मुंबईतील गोरेगावात आगीची दुर्घटना घडलेल्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी तातडीनं भेट दिली. इथे असेलल्या जमखी आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांनी त्यांना धीर दिला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी ‘आम्हाला आरोप करणं सोप्पं असतं, कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण आम्ही जबाबदार विरोधीपक्ष आहोत, याक्षणी आरोपप्रत्यारोपांचं राजकारण करणार नाही’, असं त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं.

पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रथम गोरेगाव दुर्घटनेसंदर्भातील मिळालेली माहिती दिली. ते म्हणाले, ‘ही दुर्घटना काल रात्री घडली. मध्यरात्री तीन सव्वातीनच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. दुर्दैवी गोष्ट अशी आहे की यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 42 जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रार्थना ही आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत’.

यानंतर त्यांनी याठिकाणी भेट देण्याचं कारण देखील स्पष्ट केलं. ‘या दुर्घटनेची चौकशी होईल, कारवाई होईल. पण आज या लोकांना धीर देणं महत्त्वाचं आहे. प्रार्थना आणि उपचार यातून जे लोक आपण वाचवू शकतो ते वाचवणं महत्त्वाचं आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘आजचा क्षण आणि घटना लक्षात घेता आपण राजकारणात जाऊ नये, कुठल्याही गटाचे जरी असले तरी राजकारण करणे योग्य राहणार नाही. चौकशी जी व्हायची ती होईल. पण आज महत्त्वाची गोष्ट हीच आहे की यात जे गंभीर असतील त्यांना यातून बाहेर काढणं आणि धीर देणं हेच मुख्य काम आहे’, असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

‘आम्हाला आरोप करणं सोप्पं असतं, कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण आज ही आरोप करण्याची वेळ नाही, असं त्यांनी ठणकावलं. नंतर चौकशा होतील त्याच्यात प्रतिसाद किती वेळाने आला? काय झालं? कोणी आग विझवली? हे सगळं समोर येईलच. मात्र आम्ही जबाबदार विरोधीपक्ष आहोत आणि आम्ही आज आरोप लावणार नाही. जे काही आम्हाला समोर आणायचं असेल ते आम्ही जबाबदार पणे आणू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई, महाराष्ट्र असो किंवा देश असो आगीपासून संरक्षण हे महत्त्वाचंच आहे. आपली मुंबई फायर ब्रिगेडमध्ये आपण पाहिलं असे की, गेल्या 25 वर्षात मोठे लॅडर, मोठे इंजिन, ड्रोन, रोबट्स हे आम्ही आणलं आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये फायर सेफ्टी यंत्रणा आपण लावलेली आहे. आता ती कार्यरत आहे की नाही हा एक वेगळा प्रश्न झाला. मात्र आम्ही विरोधीपक्षात असलो तरी जबाबदार विरोधीपक्ष आहोत आणि आज प्रश्न विचारणं किंवा आरोप करण्यासाठी नाही. तर लोकांना धीर देण्यासाठी आम्ही येथे आल्याचं त्यांनी सांगितलं.