भ्रष्टाचाराचे आणि जुलमी राजवटीचे थैमान सुरू आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र लिहून त्यात मुंबईतील घोटाळ्यांबाबत काही प्रश्न केले आहेत. या पत्रातून त्यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्री व राज्य सरकारवर देखील निशाणा साधला.

”घटनाबाह्य व अनैतिक मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी, महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीच्या वतीने, तुमच्या थेट निरीक्षणाखाली मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘रस्ते मेगा घोटाळ्याला’ जवळपास एक वर्ष झाले आहे. या रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमितता आम्ही सातत्याने मांडली आहे. अगदी तुम्ही ज्या पद्धतीने ही कंत्राटे त्यांना ‘भेट’ दिलीत इथपासून, ते त्या कंत्राटदारांना मिळणारा अवास्तव पैसा, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदारांना होणारा प्रचंड आर्थिक नफा आणि हे सगळं होताना प्रत्यक्षात मात्र मुंबईत काहीही कामे झालेली नसणे इथपर्यंत. प्रशासक म्हणून तुमच्या देखरेखीखाली मागच्या एका वर्षाच्या काळात मुंबई महानगरपालिकेची दयनीय अवस्था होत चाललेली बघून मुंबईकर हैराण झाले आहेत. मग तो स्ट्रीट फर्निचर घोटाळा असो की रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा असो की सुशोभीकरण घोटाळा… आणि असे अजून बरेच घोटाळे जे आम्ही उघड करणार आहोत… यातून प्रकर्षाने दिसून येते ती, मुंबई महानगरपालिकेची ढासळत चाललेली कार्यक्षमता आणि वाढत चाललेला प्रचंड भ्रष्टाचार”, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

या पत्रातून त्यांनी रस्ते मेगा घोटाळ्याच्या संदर्भात काही प्रश्नही विचारले आहेत. ”1. दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या कंत्राटदाराला अद्याप ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे का? केले असल्यास, ती माहिती सार्वजनिक केली पाहिजे आणि इतर सर्व राज्ये आणि शहरांनाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. 2. वर नमूद केलेल्या कंत्राटदाराला त्याच्या गुन्ह्यासाठी देय असलेला दंड भरावा लागला आहे का? 3. कामातला हा हलगर्जीपणा, चूकीच्या प्रशासकीय पद्धती, भ्रष्टाचार आणि घोटाळा, ज्यामुळे कंत्राटदाराचे निलंबन करावे लागले, त्याबद्दल जबाबदार असलेले रस्ते विभागाचे अधिकारी आणि खुद्द महापालिका आयुक्त चौकशीला सामोरे जातील का? कधी केली जाईल? 4. दक्षिण मुंबईतील रस्त्याच्या कामांची सुरुवात व्हावी यासाठी नव्या कंत्राटदाराची निवड कधी केली जाईल? 5. रस्ते मेगा घोटाळ्यातून दिल्या गेलेल्या कामांमधील सद्यस्थितीत किती कामे सुरु झाली आहेत? त्यांची आजची स्थिती काय आहे? 6. रस्त्यांच्या कामाची सद्यस्थिती आम्हाला तपासता यावी यासाठी मुंबईकरांना आश्वासन दिलेले सीसीटीव्ही आणि सार्वजनिक डॅशबोर्ड मुंबई महानगरपालिकेने बसवले आहेत का?”, असे प्रश्न त्यांनी महापालिका आयुक्तांना विचारले आहेत.

राज्यात जुलमी राजवटीचे थैमान

”आम्ही विचारलेले काही मूलभूत आणि साधे प्रश्न आहेत. मी आशा करतो की, या प्रश्नांची धादांत खोटी आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी उत्तरे प्रतिसाद म्हणून आम्हाला पाठवली जाणार नाहीत. (हो कारण, सध्या अनैतिक राजवटीच्या काळात मुंबई महानगरापलिकेत तसेच करण्याचा आदेश आहे) निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसताना मुंबई महानगरपालिकेत सध्या गोंधळाचे, अपारदर्शक पद्धर्तीचे, भ्रष्टाचाराचे आणि जुलमी राजवटीचे थैमान सुरु आहे.मी पुन्हा एकदा फक्त आशाच करु शकतो की, आजवर जसा प्रतिसाद मिळाला (किंवा मिळालाच नाही) तसे होणार नाही आणि या वेळेस कृती होईल. रस्ते मेगा घोटाळ्यातील 5 ही कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट मधे टाकले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला जाईल”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.