आसाममध्ये सीएएविरोधात निदर्शने, विरोधी पक्षांसह विद्यार्थी संघटनांही आक्रमक

केंद्र सरकारने नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, 2019 लागू केल्यानंतर आसाममध्ये या कायद्याला जोरदार विरोध होत आहे. राज्यात केंद्र सरकारवर टीका केली जात असून त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आता ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (एएएसयू) आणि 30 स्वदेशी संघटनांनी सोमवारी गुवाहाटी, बारपेटा , लखीमपुर, नलबाडी, दिब्रुगढं आणि तेजपुरसहित राज्याच्या विभिन्न भागात वादग्रस्त कायद्याच्या प्रती जाळल्या. याशिवाय आसाममधील 16 पक्षांच्या संयुक्त विरोधी पक्षाने (यूओएफ) टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवारी राज्यभरात निदर्शनं केली.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) अधिसूचित केल्यानंतर ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने (एएएसयू) राज्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. एएएसयू चे मुख्य सल्लागार समुज्जल भट्टाचार्य म्हणाले की, आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सीएएच्या प्रती जाळण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी, नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एईएसओ) च्या वतीने प्रदेशातील सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये सीएएच्या प्रती जाळल्या जातील. आसामच्या 16-पक्षीय युनायटेड अपोझिशन फोरम (यूओएफ) ने मंगळवारी राज्यव्यापी संपाची घोषणा केली, तसेच टप्प्याटप्प्याने इतर आंदोलन केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले आहे, तसेच डिसेंबर 2019 मध्ये हा कायदा संमत झाल्यानंतर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती अशा जवळपास सर्वच शहरांतील प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

विद्यार्थी संघटनेचे समुज्जल भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्ही सीएए विरोधात आमचे आंदोलन सुरू ठेवू. आम्ही आमचा कायदेशीर लढाही सुरूच ठेवू असे सांगितले. पुढे म्हणाले, मंगळवारी नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एनईएसओ)कडून प्रदेशातील सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये सीएएच्या प्रती जाळल्या जातील. आसाममध्येही आम्ही मशाल मिरवणूक काढू आणि दुसऱ्या दिवसापासून सत्याग्रहाला सुरुवात करू, असे ते म्हणाले. सीएएच्या निषेधार्थ आसाममध्ये संप पुकारणाऱ्या राजकीय पक्षांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तुमच्या विरोधात कारवाई सुरू केली जाईल आणि सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेच्या नुकसान केल्याची  किंमतही तुमच्याकडून आणि तुमच्या संस्थेकडून वसूल केली जाईल,” असे नोटीसमध्ये म्हटले आहे.