मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो, ‘आदिपुरुष’चा संवाद लेखक मनोज मुंतशीरचा माफीनामा

“तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की तो जलेगीभी तेरे बाप की!”, असे सडकछाप संवाद वायुपुत्र हनुमानाच्या तोंडी घातल्याने ‘आदिपुरुष’चा संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. या ट्रोलिंगनंतर मनोज मुंतशीर याला उपरती झाली असून त्याने राम, हनुमान भक्तांची माफी मागितली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील सडकछाप संवाद व गंडलेले व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले संवाद ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. हा वाद एवढा वाढला की निर्माते, दिग्दर्शक आणि संवाद लेखकाविरोधात थेट पोलीस स्थानकात तक्रारी करण्यात आल्या, तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.

चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास तीन आठवडे उलटले असले तरी वाद थांबलेला नाही. त्यामुळे अखेर मनोज मुंतशीर शुक्ला याने हात जोडून माफी मागितली आहे. शनिवारी सकाळी मनोज याने एक ट्विट केले आहे. यात त्याने आपण चाहते, साधु-संत आणि प्रभू श्रीराम भक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागत असल्याचे म्हटले आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधु-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो. तसेच आपल्याला एकजूट आणि अटूट राहून आपल्या पवित्र सनातन आणि महान देशाची सेवा करण्याची शक्ती देओ’, असे ट्विट मनोज मुंतशीर शुक्लाने केले आहे.