हुबेहूब कोहलीसारख्या दिसणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची भावूक पोस्ट लिहून निवृत्तीची घोषणा

हुबेहूब विराट कोहलीसारखा दिसणारा पाकिस्तानी खेळाडू अहमद शहजाद याने पाकिस्तान सुपर लीगमधून (पीएसएल) निवृत्तीची घोषणा केली आहे. पीएसएलमधील संघमालकांनी आपल्याला जाणूनबुजून डावलल्याचा आरोप अहमद शहजाद याने केला आहे. त्यामुळे त्याने पीएसएलमध्ये पुन्हा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अहमद शहजाद याने पीएसएसमधील संघमालकांनी जाणूनबुजून आपल्याला डावलल्याचा आरोप केला आणि पीएसएलला रामराम करण्याचा निर्णय घेतला. अहमद शहजादने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘पाकिस्तान सुपर लीगला रामराम. ही पोस्ट मी याच वर्षी लिहिन असे वाटले नव्हते. पुन्हा एकदा माझी निवड करण्यात आली नाही, का ते देवालाच ठावूक’, असे शहजादने लिहिले.

मी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वस्व पणाला लावून मेहनत घेत आहे आणि पीएसएलच्या ड्राप्टआधी राष्ट्रीय टी-20 स्पर्धेतही चांगली कामगिरी केली. परंतु मला जाणूनबुजून डावलण्याचा प्रयत्न होतोय, कारण माझ्याहून खराब कामगिरी केलेल्या खेळाडूंचीही निवड होत आहे. पीएसएलमध्ये माझी निवड का झाली नाही हे मला माहिती आहे. संपूर्ण देशाला आणि माझ्या चाहत्यांनाही लवकरच हे कळेल, असे म्हणत शहजाद याने पीएसएस संघमालकांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

मी वेगळा मार्ग निवडत असून आत्मसन्मानासाठी पीएसएलला रामराम करण्याचा निर्णय घेत आहे. मी कधीच पैशांसाठी खेळलो नाही आणि कधी असे करणारही नाही. अनेकांनी जगभरातील लीगला प्राधान्य दिले, मात्र मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. आताही पैशांना प्राधान्य न देता मी हा निर्णय घेत आहे. मी या 6 संघांकडून पुन्हा पीएसएल खेलणार नाही. मला पीएसएसपासून लांब ठेवण्याचे सर्व संघमालकांनी षडयंत्र रचले, असा आरोप शहजाद याने केला.

दरम्यान, अहमद शहजाद याने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो पदार्पणाचा वन डे सामना खेळला. त्यानंतर मे 2009 मध्ये त्याने टी-20 आणि 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017 तो आपला अखेरचा कसोटी आणि वन डे, तर 2019 ला अखेरचा टी-20 सामना खेळला होता.