थंडीने पकडला मुंबईकरांचा गळा; घशात खवखव, सर्दी-खोकल्याने बेजार केले

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात तसेच राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत पारा तब्बल 4 अंश सेल्सियसने घसरला असून धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. आधीच थंडी त्यात प्रदूषण यामुळे दवाखाने, रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला अशा तक्रारी घेऊन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

मुंबईत जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. मोठय़ा प्रमाणावर बांधकामेही सुरू आहेत. मेट्रो, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. प्रदूषण कमी करणाऱया पाणी फवारणी मशीन आहेत परंतु त्यांची संख्याही तोकडी आहे. त्यामुळे धुरके, धूळ खाली बसत नाही आणि प्रदूषण वाढते, असे चित्र मुंबईत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची चादर पसरल्याचे दिसत आहे.

मुंबईतील किमान तापमान
बोरिवली 16
चेंबूर 16
कुलाबा 19
मुलुंड 16
सांताक्रुझ 16

दवाखान्यांमध्ये प्रचंड गर्दी
खासगी दवाखान्यांमध्येही सर्दी, खोकला, नाक गळणे, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत. अशी माहिती कांदिवली येथील फॅमिली फिजिशियन डॉ. संजीव कुदळे यांनी दिली. सकाळच्या वेळी मार्ंनग वॉकला जाणे टाळावे. मास्कचा वापर करा, सर्दी, खोकला असेल तर पुढे आजार आणखी बळावू नये यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरगुती उपचार करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.