सगळं कसं ठरल्याप्रमाणे, अजितदादा आणि सुनेत्रा पवारांनाही क्लीन चिट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनाही 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळय़ात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही. बँकेने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असा निष्कर्ष ईओडब्ल्यूने काढला आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे पवार दाम्पत्याला हा दिलासा मिळाला आहे.

ईओडब्ल्यूने विशेष पीएमएलए न्यायालयात 35 पानी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टबाबत कमालीची गोपनीयता ठेवली होती. अखेर ऐन लोकसभा निवडणुकीत या अहवालाचे बिंग फुटले. साखर कारखान्यांना कर्ज देण्यासंबंधी व्यवहारांमध्ये अनियमितता वा गैरकृत्य नाही. तसेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना गुरू कमोडिटीकडून भाडेतत्त्वावर घेण्यामध्येही बेकायदेशीर आढळले नाही, असे ईओडब्ल्यूने अहवालात म्हटले आहे. तपास यंत्रणेने 2020 मध्ये पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. नंतर मिंधे सरकारने त्यावेळी महाविकास आघाडीसोबत असलेले अजित पवार, रोहित पवार यांची चौकशी करण्यासाठी फाईल पुन्हा उघडली होती. आता अजित पवार यांनी मिंधेंचा हात धरल्यानंतर ईओडब्ल्यूने अधिक तपासात कोणतेही गैरकृत्य न आढळल्याचा दावा करीत अतिरिक्त रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे सत्ताधारी व ईओडब्ल्यूची ‘महायुती’ समोर आली आहे.

व्यवहाराच्या दोन वर्षांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी दिला होता संचालकपदाचा राजीनामा

सुनेत्रा पवार जय ऍग्रोटेकच्या संचालिका होत्या. जय ऍग्रोटेकने जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडला पैसे दिले. त्या व्यवहाराच्या दोन वर्षे आधी सुनेत्रा पवार यांनी जय ऍग्रोटेकच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता, असे ईओडब्ल्यूने म्हटले आहे.

क्लोजर रिपोर्टमध्ये काय?

– जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावासाठी एकूण 13 निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्या 2010 मध्ये ओमकार बिल्डरच्या अंधेरीस्थित गुरू कमोडिटीज सर्व्हिसेस या कंपनीला 65.8 कोटी रुपयांना विकल्या.
– गुरू कमोडिटीजने ताबडतोब संबंधित साखर कारखाना नव्याने स्थापन केलेल्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिला.
– कंपनी स्थापनेनंतर अवघ्या दोन आठवडय़ांतच 19 नोव्हेंबर 2010 रोजी अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे हे संचालक असलेल्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जय ऍग्रोटेककडून 20.3 कोटी रुपये मिळाले होते, मात्र हा व्यवहार होण्याच्या दोन वर्षे आधीच सुनेत्रा पवार यांनी जय ऍग्रोटेकच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

ऐन निवडणुकीत साक्षात्कार

निवडणुकीच्या रणधुमाळीतच ईओडब्ल्यूला कोटय़वधी रुपयांच्या शिखर बँक घोटाळय़ात ‘पवार दाम्पत्याने कोणतेही गैरकृत्य न केल्याचा’ साक्षात्कार झाला. सत्ताधाऱयांवरील ही ‘मेहरनजर’ राजकीय वर्तुळात टीकेचा विषय बनली आहे.