अजित पवारांचं चलो दिल्ली; खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहानां भेटणार

ajit pawar amit shah

सत्तेत सहभागी झाल्यानंतर आठवडा उलटून देखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अद्याप खातं देण्यात आलेलं नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांना खाते वाटप करून देणं आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं मंत्र्यांना मागणीप्रमाणे खातं मिळावं यावर अजित पवार गट ठाम आहे. त्यातील काही खाती ही सध्या मिंधे गटाकडे आहेत. ही खाती गेल्यानंतर आपल्याला कुणी विचारणार नाही अशी भिती मिंधे गटातील मंत्र्यांना वाटत आहे. त्यामुळे संबंधित खातं आपल्याकडेच रहावं यावर हे आमदार अडून आहेत. तर या दोघांच्या वादात भाजपच्या आमदारांकडे कुणी बघायलाच तयार नाहीत. त्यामुळे तिन्हीकडे कमालीची नाराजी आहेत. या तिढा राज्यात सूटत नसल्यानं आज संध्याकाळी अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांवरून सूत्रांच्या आधारे दिली जात आहे.

अजित पवार यांनी राज्यातला गोंधळ सोडवण्यासाठी आता दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतल्याचं कळतं आहे. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील दिल्लीत जाणार असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बातचित करून हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात सुरू असलेल्या गोंधळानं भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, तसंच भाजपच्या वाट्याला आलेली खाती देखील कमी होणार असल्यानं त्यांना वाट्याला फक्त निराशा आली आहे. त्यामुळे आता काय तो तोडगा दिल्लीतच निघेल यावर सत्तेत सहभागी झालेल्या तिघांनाही वाटत असल्याचं बोललं आहे.