एसआरपीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष; पोलिसांप्रमाणे भत्ते व फायदे देण्याची मागणी

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपी) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांनी पोलिसांप्रमाणे भत्ते व फायदे देण्याची मागणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) स्वयंपाकी, न्हावी, सफाईगार, धोबी असे कर्मचारीही आहेत. या पोलिसांसोबत हे चतुर्थ श्रेणी कर्मचारीही जातात. नोकरीमुळे कुटुंबापासून दूर असतात. पोलिसांसमवेत जात असतात, त्यांच्याबरोबर राहून सेवा देतात. मात्र, पोलिसांना ज्याप्रमाणे भत्ते आणि फायदे दिले जातात, तसे त्यांना मिळत नाहीत. या मागण्यांसाठी राज्य कर्मचारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्चेतून तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

राज्य राखीव पोलीस दलातील चतुर्थश्रेणी कर्मचारी हे पोलीस जवानांसमवेत अविरत कर्तव्य बजावत असल्याने जवानांना देण्यात येणारे सर्व शासकीय लाभ त्यांना मिळावेत, कॅशलेस वैद्यकीय सुविधा त्यांना मिळाव्यात, या कर्मचाऱयांना गणवेश द्यावा. बाहेरगावी जाताना अधिक कर्मचारी आवश्यक असताना तुटपुंजे मनुष्यबळ नेले जाते, त्यामुळे त्यांच्यावर ताण पडतो, अशावेळी आवश्यक तेवढे मनुष्यबळ नियुक्त व्हावे, कामाच्या वेळा निश्चित असाव्यात, या कर्मचाऱयांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अतिसंवेदनशील भागात जाताना त्यांनादेखील संरक्षण मिळावे, बंदोबस्ताच्या वेळी कर्तव्यावर असणाऱया चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांना साप्ताहिक सुट्टीचा मोबदला दिला जावा, तसेच कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी, अशा मागण्या आहेत.

याबाबत यापूर्वी वरिष्ठ पातळीवर निवेदने दिली आहेत. पण अद्यापही कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून न्याय द्यावा, त्यासाठी चर्चेला वेळ द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.