भाजप नगरसेवक शिंदेसह टोळीला मोक्का लावा!

अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणातील भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून चत्तर कुटुंबीय आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नगर शहरातील सावेडी उपनगरमधील एकवीरा चौक परिसरात 15 जुलै रोजी अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून नगर महापालिकेचे भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सूरज कांबळे, महेश कुऱहे, मिथुन धोत्रे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, या सर्वांवर नगरसह राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुह्यांची नोंद आहे.

हे सर्व गुन्हेगार समाजासाठी घातक असून, त्यांच्यापासून मला, माझे कुटुंबीय तसेच अंकुश यांची पत्नी, मुलांसह कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे या सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देऊन मयत अंकुश चत्तर यांना न्याय द्यावा, असे बाळासाहेब सोमवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

या सर्व आरोपींविरोधात सात दिवसांच्या आत मोक्कांतर्गत कारवाई केली नाही, तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मयत अंकुश चत्तर यांची पत्नी आणि कुटुंबीय 28 सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

…तर विधानभवनासमोर उपोषण – शीतल चत्तर

अंकुश चत्तर खूनप्रकरणी अटकेत असलेला भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याला शाही बडदास्त देण्यात येत आहे, असा आरोप अंकुश चत्तर यांच्या पत्नी शीतल चत्तर यांनी केला आहे. आरोपींना मदत करणाऱया पोलीस अधिकाऱयांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत विधान भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा शीतल चत्तर यांनी दिला आहे.

सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे

भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्याविरुद्ध खून, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा, अपहरण यांसह अनेक कलमान्वये गंभीर स्वरूपाच्या सात गुह्यांची नोंद आहे. अभिजित बुलाख याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल आहे. सूरज कांबळे याच्यावर जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे, अपहरण करणे अशा सहा गुह्यांची नोंद आहे. महेश कुऱहे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल असून, मिथुन धोत्रे याच्यावरही तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुह्याची नोंद आहे. हे सर्व सराईत आणि कुख्यात आरोपी असून, यांच्यामुळे समाजालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.