भाजपविरोधी पक्ष एकवटले; बंगळुरूत आज आणि उद्या महत्त्वाची बैठक! लोकसभेच्या जागावाटपावर होणार चर्चा, सोनिया गांधींचा पुढाकार

भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम एकजूट उभी राहत असून पाटण्यानंतर आता बंगळुरूत उद्या सोमवार आणि मंगळवार अशी दोनदिवसीय बैठक होणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या बैठकीसाठी बंगळुरूला जाणार असून देशातील तब्बल 23 पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत समान किमान कार्यक्रम, लोकसभेसाठी जागावाटप यासह विविध मुद्दय़ांवर चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. बैठकीनंतर मंगळवारी सायंकाळी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे 23 जून रोजी विरोधकांची पहिली बैठक झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे या बैठकीचे निमंत्रक होते. ही बैठक यशस्वी ठरली. बैठकीला 18 पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता बंगळुरूत होणाऱ्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही बैठकीला जाणार आहेत. या बैठकीत लोकसभेचे जागावाटप व अन्य मुद्दय़ांवर चर्चा होईल. काही रुसवेफुगवे असतील तर ते दूर केले जातील, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

आज सिद्धरामय्यांकडून डिनर
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसाठी उद्या रात्री डिनरचे आयोजन केले आहे.

ही एकजूट भाजपला पराभूत करण्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचीही बैठक होत आहे. त्याबाबत विचारले असता, ही काही बैठकांची स्पर्धा नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. पाटण्यात 18 पक्ष उपस्थित होते. आता 23-23 पक्ष एकत्र येणार आहेत. या बैठकीत 2024 च्या निवडणुकीबाबत भूमिका मांडली जाणार आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले.

आघाडीचे नाव ठरणार
देशपातळीवर भाजपविरोधात उभ्या राहत असलेल्या आघाडीचे नाव बंगळुरूतील बैठकीत निश्चित केले जाणार आहे.

बैठकीचा अजेंडा
समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी उपसमितीची स्थापना.
लोकसभेसाठी आघाडी करताना संवादाचे मुद्दे निश्चित करणे.
संयुक्त कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी उपसमिती स्थापणे. सभा, अधिवेशने, आंदोलने याचा त्यात समावेश असेल.
राज्यवार जागावाटप कसे करायचे यावर चर्चा करणे.
ईव्हीएमच्या मुद्दय़ावर चर्चा करून निवडणूक आयोगाला सुधारणा सुचवणे.
नव्या आघाडीत सुसूत्रता राखण्यासाठी पेंद्रीय चिटणीस कार्यालय उभारणे.