खाऊगली -चटपटीत… चटकदार

>>संजीव साबडे

टम्म फुगलेल्या कडक पुरीत भरलेला रगडा वा मूग व उकडून कुस्करलेला बटाटा, वरून आंबट पाणी, गोड व तिखट चटणी असा सारा ऐवज जिभेवर ठेवल्या क्षणी स्वर्गसुख म्हणजे काय याची अनुभूती देणारा एकमेव पदार्थ म्हणजे पाणीपुरी. चाट, पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, दही बटाटापुरी, रगडा पॅटिस हे पदार्थ न आवडणारी व्यक्ती नीरस असू शकते यावर एकमत व्हायला हरकत नाही. अशा या चटपटीत, चटकदार खाद्यपदार्थांची मजा स्टॉलवर वा हातगाडीवरच घ्यायला हवी. मुंबई आणि उपनगरातल्या अशाच काही चाट भांडार व कॉर्नरची सैर घडवून आणण्याचा हा प्रयत्न.

पूर्वी लहान मुलांनी भेळ, पाणीपुरी असे प्रकार खायचा हट्ट धरला की, आई वा मोठी व्यक्ती सांगायची, “अजिबात ते खायचं नाही रस्त्यावरचं. बटाटे, पुऱया कुठून आणतात कुणास ठाऊक. पाणीही स्वच्छ असेल याची खात्री नाही.” हे सांगून झालं की, पुढे स्वगत सुरू व्हायचं, “काय ते रस्त्यावर खायचं आणि एक-एक पाणीपुरीसाठी तिष्ठत उभं राहायचं, आंबट-तिखट पाणी मागायचं. आपणचं पैसे द्यायचे आणि तो द्रोण पुढे करून उभं राहायचं. कसले कळकट असतात ते. अंघोळ तरी रोज करतात का कोणास ठाऊक?”

पण गेल्या काही वर्षांत विचारात किती बदल झाला पहा. मुलांना “नको” म्हणणारी आई, आजी वा मोठी व्यक्तीही रस्त्यावर पाणीपुरी खाऊ लागली. खाताना “तिखा कम बनाओ” असं सांगू लागली. मुद्दा असा की, रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, दही बटाटापुरी खाणं यात गैर वाटेनासं झालं, तसेच हे चाटचे प्रकार खूप म्हणजे खूपच लोकप्रिय झाले. रेस्टॉरंटमध्ये पुऱया, आंबट पाणी, गोड व तिखट चटणी, रगडा वा मूग व उकडून कुस्करलेला बटाटा हे सारं वेगवेगळं आणून देतात. आपणच पाणीपुरी बनवायची आणि खायची. पण स्टॉलवर, हातगाडीवर वा त्याहून लहान जागेत मिळणाऱया पाणीपुरीची मजा हॉटेलात येत नाही. चटपटीत, चटकदार चाटून (व पुसून) खाद्यपदार्थ म्हणून यांना चाट नाव पडलं म्हणे!

आपण इतक्या ठिकाणी हे प्रकार खाल्लेले असतात, पण बरीचशी चव सारखीच असते. त्याचं गुपित कळत नाही. जणू बहुतांशी जणांच्या चटण्या व पाणीपुरीचं पाणी एकाच ठिकाणी केलं असावं. पाणीपुरी वा भेळपुरी खाण्यासाठी मुद्दाम बाहेर नाही पडत. फिरायला, खरेदीला वा ऑफिसहून येताना अचानक त्या गाडीकडे लक्ष जातं आणि आपण तिथे खेचले जातो. मुंबई, ठाणे व उपनगरांत सगळीकडे प्रत्येक ठिकाणी काही चांगले चाट भांडार व कॉर्नर आहेत. तिथे जाणं होत असेलच, पण काही ठिकाणं खास आहेत. त्यांची सैर घडवून आणण्याचा हा प्रयत्न.

यात गिरगाव, जुहू किंवा मालाडच्या किनाऱयांवरील भेळवाल्यांचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे. वांद्रे पश्चिमेचं ‘एल्को मार्केट’ प्रसिद्ध व गर्दीचं आहे. तेथील पाणीपुरी आणि एकूणच चाटचे प्रकार मस्त. तिथे खरेदीला येणाऱया बहुतांशी मी व स्त्रिया तिथां चाट खाल्ल्याशिवाय घरी परततच नाहीत. विलेपार्ले पूर्वेला विमानतळाकडे जाताना ‘शर्मा चाट भांडार’ आहे. तेथील पाणीपुरी, भेळ, रगडा पॅटिस मस्त. शिवाय तिथे बर्फाचा रंगीत गोळा, कुल्फी हेही थंडगार मिळतं. अंधेरी पूर्वेला ‘रिजेन्सी रेस्टॉरंट’जवळ जिवा महाला रस्त्यावर संध्याकाळी ‘भोला चाट भांडार’च्या गाडीपाशी झुंबड असते. पाणीपुरीच्या आंबट पाण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जातं. तेथील पाणीपुरी अगदी खास. शिवाय भेळ, शेव बटाटापुरी हे खाणारेही असंख्य.

बोरिवलीत बाभई नाक्यापाशी ‘जनता भेळपुरी कॉर्नर’ लोकप्रिय आहे. सर्व चाट प्रकारांबरोबर तेथील असंख्य प्रकारची चिक्की प्रसिद्ध आहे. कांदिवलीचं ‘जैन स्वीट आणि भेळपुरी’ अतिशय लोकप्रिय ठिकाण मानलं जातं. तिथे मिठाई व फरसाणचे प्रकारही मिळतात. गोरेगावच्या जवाहर नगरमध्येही ‘जैन स्वीट’ आहे. तेथील दहीवडा खाल्ला तरी पोट भरतं. तिथे दही कचोरी, रगडा पॅटिस खाणारेही खूप. पूर्व उपनगरांत असाल तर मुलुंड, घाटकोपर, सायन, चेंबूर या भागांत अनेक प्रसिद्ध व जुनी चाट भांडार वा कॉर्नर आहेत. शीव-सायनचं ‘गुरुकृपा’ हे सर्वच पंजाबी, सिंधी खाद्य प्रकारांसाठी प्रख्यात. तेथील कचोरी व सामोसा लोकांना खूप आवडतो. त्याच भागात ‘जय अंबे’, ‘इंदोरी चाट’ व ‘ममता’ असे भेळपुरी व चाटवाले प्रसिद्ध आहे. मुलुंड पश्चिमेला महात्मा गांधी मार्ग आणि गणेश गावडे रोडवरील ‘जय जलाराम’ची आईस पाणीपुरी आणि आईस भेळ, आईस दहीपुरी, रगडापुरी, भेळपुरी ही खासीयत आहे. मुलुंड पूर्वेला हनुमान चौकात ‘ओम गुरू’ वा तत्सम नावाच्या भेळपुरीवाल्याकडेही संध्याकाळ होताच गर्दी वाढते. चेंबूरच्या गावठाणातील ‘गुप्ता भेळ स्टॉल’ आणि डॉ. आंबेडकर उद्यानाजवळील ‘विजय भेळ स्टॉल’ नेहमी गर्दी खेचत असतो. त्यांच्याकडे जागा कमी आहे, पण चव, स्वच्छता, टापटीप याबाबतीत ते एक नंबर म्हणून ओळखले जातात. तुम्ही घाटकोपर पूर्वेला गेला असाल तर तिथला ‘मिठाईलाल भेळवाल्या’कडे नक्की जा. त्याच्याकडे चाटचे असंख्य व चविष्ट प्रकार खायला मिळतील. याखेरीज घाटकोपरच्या ‘वर्षा चाट सेंटर’मध्ये मिळणारी भेळ, शेवपुरी व अन्य सर्वच पदार्थ मस्त व चमचमीत असतात.

महत्त्वाचे चाटवाले राहिले. बोरीबंदरला एम्पायर सिनेमाच्या मागे व एक्सेलसिअर सिनेमाच्या अलीकडे मुंबईतला सर्वात प्रख्यात ‘विठ्ठल भेळपुरी’वाला होता. सुमारे 100/125 वर्षांपासून फुटपाथवर पाणीपुरी, भेळपुरी विकता विकता त्याच्या वारसदारांनी त्या इमारतीत दोन जागा विकत घेतल्या आणि त्यांपैकी एके ठिकाणी प्रचंड आकाराचं चाट रेस्टॉरंट सुरू केलं. नजर लागावी इतकं जोरात चालणारे रेस्टॉरंट काही वर्षांपूर्वी बंद पडलं. मात्र चर्चगेटला पूर्वीच्या नटराज हॉटेलजवळच्या पाणीपुरीवाल्याकडे आजही संध्याकाळी गर्दी होते. कारमधून उतरून लोक तिथे पाणीपुरी खातात. हॉटेलात उतरणाऱयांचाही तो आवडीचा आहे. बोरा बाजारातील ‘हरिओम भेळपुरी सेंटर’ खूप लोकप्रिय आहे. ऑफिसातून घरी जाताना अनेक जण तिथे भूक शमवताना दिसतात.

गिरगावात ताराबागेजवळचा पाणीपुरीवालाही खूप जुना. गिरगावच नव्हे, मुंबईभरातील लोक पाणीपुरी खाण्यासाठी तिथे रोजच्या रोज गर्दी करतात. कडक शिस्तीचा आणि मस्त चवीचा असं त्याचं वैशिष्ट्य आहे. याशिवाय ठाकुरद्वारचा ‘दरबार चाट’ आणि साहित्य संघ, केळेवाडीतला ‘ओम यादव भेळपुरीवाला’ही खासच. ताडदेवात ‘स्वाती स्नॅक्स’मधील चाटचे सर्व प्रकार मस्त व स्वच्छ. सांपूझ पश्चिमेचा ‘रामश्याम भेळपुरी स्टॉल’, अंधेरीच्या लोखंडवालामधील व वांद्रे येथील ‘पंजाब स्वीट हाऊस’ही विविध चाटसाठी प्रसिद्ध आहे. आणि हो, ठाण्यात असाल वा गेलात तर ‘दिलीप चाट कॉर्नर’ आणि ‘सुरेश अंकल पाणीपुरीवाल्या’कडे चक्कर मारायलाच हवी!
[email protected]