क्रौर्य का वाढतंय?

डॉ. रोहन जहागिरदार

देशाची राजधानी दिल्लीतील गीता कॉलनीत पुन्हा एकदा एका महिलेची हत्या करून तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. श्रद्धा वालकरचं प्रकरण असो, निक्की यादवचं प्रकरण असो किंवा महाराष्ट्रातील दर्शना पवारचं हत्या प्रकरण असो किंवा मुंबईतील लालबागमधील मुलीने केलेलं कृत्य असो; ही सर्व प्रकरणं विकृत मनोवृत्तीची निदर्शक आहेत. विकृतीचा परमोच्च बिंदू असं याला म्हणता येऊ शकेल; पण मुळाशी जाऊन विचार करता नकार पचवता न येणं आणि हिंसेबाबत फारसं गांभीर्य न उरणं याचा हा परिपाक आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तीच्या हातून अशा घटना सर्रास घडतात. त्या टाळण्यासाठी संवाद, सुसंस्कार आणि संवेदनक्षमतेची गरज असून त्यांची पेरणी कुटुंबातून व्हायला हवी.

आपल्या मनासारख्या घटना न घडणं, नकार पत्करावा लागणं या गोष्टींना अतिशय वेगळ्या पद्धतीने, हिंसकरीत्या प्रतिसाद देणं ही विकृती आहे. बरेचदा अशी कृत्ये करताना त्याच्या वैयक्तिक, सामाजिक परिणामांची, कायद्याची जाणीव नसते; तर काही वेळा जाणीव असूनही असं हिंसात्मक पाऊल उचललं जातं. जाणीव असताना अशी कृत्ये घडल्यास त्याला सायकोपॅथ किंवा सोशोपॅथ म्हटलं जातं. कल्पना नसताना अशी कृती घडल्यास त्याला इम्पलसिव्ह म्हटलं जातं. म्हणजेच घडलेल्या घटनेमुळे धक्का बसून रागावर किंवा भावनांवर नियंत्रण न राहणं. अनेकदा अशा स्थितीत कृती घडून गेल्यानंतर सदर व्यक्तींमध्ये पश्चातापाची भावनाही दिसून येते, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. दिल्लीतील घटना असो वा अन्य घटना असो, त्यामध्ये हिंसक पाऊल उचलणाऱया व्यक्तींची मनोवस्था साधारण होती का, भूतकाळात अशा प्रकारच्या कृती त्यांच्या हातून घडल्या होत्या का, हे पाहणं गरजेचं ठरतं.

दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाण पुलाजवळ अलीकडेच एका 35-40 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याचे वृत्त समोर आले आणि राजधानीसह संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला.

गतवर्षी आफताब नावाच्या व्यक्तीने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱया श्रद्धा वालकर या महिला सहकाऱयाला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून दिल्लीला आणलं. काही दिवसांनी श्रद्धाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तेव्हा आफताबने तिची हत्या करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. मुंबईतील लालबागमध्ये एका 24 वर्षांच्या मुलीने बॉयफ्रेंडसाठी आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आईची हत्या करून तिने तिचे तुकडे तुकडे करून कपाटात लपवले होते.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावणाऱया दर्शना पवारचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला. पोलीस तपासातून दर्शनाच्या मित्रानेच तिची हत्या केल्याचं समोर आलं.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिवपेठेतील एका तरुणीवर भरदिवसा कोयत्याने वार करण्यात आला. या हल्ल्यामागे त्या मुलीने प्रेमसंबंधांना दिलेला नकार हे कारण असल्याचं सांगितलं गेलं.

अशा घटनांची संख्या वाढत चालली असली तरी त्याकडे सामूहिकरीत्या पाहणे योग्य ठरणार नाही किंवा असा काही तरी ट्रेंडच आला आहे असंही म्हणता येणार नाही. कारण मुळात या सर्व घटनांमध्ये काही साम्यस्थळे असली तरी प्रत्येक प्रकरण वेगळं आहे. तसंच हिंसा करणाऱया व्यक्तीही वेगवेगळ्या आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे की, अशा प्रकारची निर्घृण कृत्ये करणं ही एक विकृती आहे. त्यामुळे अमानुषपणाने एखाद्याचा जीव संपवण्याचा प्रयत्न करणाऱया व्यक्तींमध्ये काही स्वभावदोष होते का, काही आजार होते का, हे सर्वप्रथम पाहणं गरजेचं ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व घटनांचा लसावी काढून त्याकडे पुरुषप्रधानतेच्या चष्म्यातून पाहणं योग्य ठरणार नाही. कारण महिलांकडूनही अशा प्रकारच्या हिंसा घडताना अनेकदा दिसून आल्या आहेत. तसंच बरेचदा अशा घटनांमध्ये बचावासाठी धावून येणाऱयांमध्ये पुरुषांचाही सहभाग असतो असंही आढळलं आहे. अशा घटनांकडे मानसशास्रीय दृष्टिकोनातून पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.

लहानवयापासून वर्तनातला दोष दुर्लक्षिला गेल्यामुळे, प्रोत्साहन मिळत गेल्यामुळे किंवा त्याबाबत कधी कुणी समज न दिल्यामुळे असे दोष वाढत जातात. यासाठी अनेक वर्षं लागतात, पण एकदा ते स्वभावात रुढ झालं की त्यातून अनेक गैरप्रकार घडतात. स्वभावदोष हे अनेक प्रकारचे असतात. अशा घटनांमध्ये दिसणाऱया स्वभावदोषांना पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हटलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर (एएसपीडी), बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी
डिसऑर्डर (बीपीडी), हिस्टॉरिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि नार्किसिस्टीक पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे याचे चार प्रमुख प्रकार असून सामान्यत अशा हिंसक घटनांमध्ये या आजारांचे रुग्ण अधिक सािढय दिसतात. अँटी सोशल म्हणजे समाजविरोधक, बॉर्डरलाइन म्हणजे भावानिक आणि मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असणारे, नार्किसिस्टीक म्हणजे सदैव मीच बरोबर, तुम्ही चूक असं मानणारे लोक.

हिस्टॉरीक पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही समस्या प्रामुख्याने स्त्रियांमध्ये दिसून येते. यामध्ये नाटकीय पद्धतीने परिस्थिती मांडणे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी लोकांना त्रास देणे अशी विचित्र मनोवस्था असते. सर्व डिसऑर्डरमुळे घडणाऱया हिंसा, आक्रमकता यांसारख्या क्रियांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे इतरांवर हिंसा करणे आणि दुसरे म्हणजे नकार पचवता न आल्यामुळे निर्माण झालेला राग व्यक्त करता न आल्यास स्वतला इजा करून घेणे. यासाठी डोके आपटून घेणे, आत्महत्येची धमकी देणे, टोकदार वस्तूंनी हातावर वार करून घेणे असे प्रकार केले जातात. हे सर्व स्वभावदोष असून त्याबाबत संपूर्ण समाजाला दोषी ठरवणं चुकीचं ठरेल. कारण तो त्या व्यक्तीचा मनोविकार आहे. समाजाचा विचार करता बदलत्या काळाबरोबर सामाजिक बदल होत आहेत, हे नाकारता येणार नाही. ते थांबवणं आपल्या हातात नसतं. त्याऐवजी आपल्या हातात असणाऱया गोष्टी करता येतील. यामध्ये मुलांमध्ये मूल्यांची, संस्कारांची रुजवणूक सर्वांत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर बदललेल्या परिस्थितीत स्वतला कसं जपायचं याची काळजी प्रत्येक जण घेऊ शकतो. विक्षिप्तपणा, विचित्रपणा हा एकाएकी समोर येत नाही. त्याची काही तरी लक्षणं दिसत असतात. त्यामुळे मैत्री करताना, संबंध ठेवताना ते आपल्यासाठी सपोर्ट सिस्टीम ठरणारं आहे की आपलं नुकसान करणारं आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, पीअर प्रेशर टाळलं पाहिजे. म्हणजेच इतर लोक करताहेत म्हणून मी केलं पाहिजे असा अट्टहास ठेवू नये. आपल्यासाठी काय भलं आहे, चांगलं आहे याचा विचार करावा. आपला वेळ आणि आपली मैत्री हा आपल्यासाठी चॉईस आहे. तो आपल्यासाठीच वापरावा. साधारणत 12 ते 18 वयोगटातच मुलांमध्ये या सर्वांची बीजपेरणी केली गेली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मुलांना कोणतीही वस्तू देताना थोडी वाट पाहायला लावा. त्यातून मी म्हणेन तसं, म्हणेन तेव्हा घडणार नाही, याची जाणीव कुटुंबातून करून दिली पाहिजे. त्याचबरोबर बालवयातच मुलांना नकार पचवायला शिकवणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यातील वाटचालीत नकार मिळाल्यास त्याला दिला जाणारा प्रतिसाद घातक असणार नाही.

ज्या घरांमध्ये हिंसकपणा, आाढमकता कौटुंबिक वातावरणातच दिसत असेल, आई-वडिलांमध्ये भांडणं होत असतील तिथे मुलांना अशा आाढमकतेबाबत गैर वाटणार नाही. घरात भांडणं होतात, मारझोड होते; मग बाहेरही तसंच वागलं तर काय चुकलं अशी मानसिकता मुलांची होऊ शकते. त्यामुळे कौटुंबिक वातावरणात सुसंवाद, चर्चा यांवर अधिक भर दिला गेला पाहिजे. आज पालक आणि मुलांमधील वैचारिक दरी रुंदावत चालली आहे. आपण आपल्या जागी बरोबर आहोत, अशी दोघांचीही भूमिका असते; त्यामुळे त्यामध्ये सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. याखेरीज अनेकदा अशा हिंसात्मक कृतीमध्ये व्यसनांचाही परिणाम असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे व्यसनांपासून दूर ठेवून स्वतचा मनोविकास, बौद्धिक विकास, शारीरिक विकास करण्याची शिदोरी मुलांना देणं हाच अशा समस्या भविष्यात उद्भवू न देण्याचा मार्ग आहे.
(लेखक प्रख्यात मानसोपचारतज्ञ आहेत.)