विज्ञान-रंजन – गोष्ट वैश्विक योगायोगाची…

>> विनायक

आठ एप्रिलच्या खग्रास सूर्यग्रहणावर अमेरिकेतल्या आणि विशेषतः ऑस्टिनमध्ये असलेल्या मराठी ‘खगोल मंडळीं’नी इथून केवळ ग्रहणाच्या निमित्ताने तिथे गेलेल्या नंदकुमार वाळवे यांच्या सक्रिय सहकार्याने आणि ऑस्टिनकर (टेक्सास) अमोल मांदुस्करच्या नियोजनातून या ग्रहणासह आम्ही सर्वांनी हिंदुस्थानातून 1995 पासून पाहिलेल्या अनेक खग्रास सूर्यग्रहणांच्या स्मृती जागवत एक मराठी-इंग्लिश पुस्तिकेच प्रसृत केली. 1995 मध्ये आलेल्या ‘टोटॅलिटी’चा हा पुढचा टप्पा होता. त्यानिमित्ताने खग्रास सूर्यग्रहणासंदर्भात पह्नवरून अनेकांशी चर्चा करताना लक्षात आलं की, असं विलोभनीय खग्रास सूर्यग्रहण आपण केवळ पृथ्वीवर आहोत आणि चंद्रासारखा आपला नैसर्गिक, वैशिष्टय़पूर्ण उपग्रह आहे म्हणूनच पाहू शकतो. तेच हे विज्ञान रंजन.

पृथ्वीऐवजी आपण बुध किंवा शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर कल्पनेने गेलो तरी तिथून कधीच खग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही. कारण या ग्रहांना ‘चंद्र’च नाही. पृथ्वीच्या बाहय़ कक्षेतील मंगळ ग्रहावर आपण जाऊ शकतो, परंतु मंगळाचे दोन उपग्रह (चंद्र) पह्बो आणि डिमो हे आकाराने अवघ्या काही किलोमीटरच्या महापाषाणांसारखे असल्याने ते सूर्यबिंब पूर्णपणे झाकणं शक्यच नाही. मात्र ते मंगळ आणि यांच्यामध्ये एका सरळ रेषेत आले की, सूर्यावरून ओबडधोबड आकाराचे काळे डाग सरकल्यासारखं दिसतं. आता त्याला मंगळावरून दिसणारं कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणता येईल का? तर तो आकार पंकणासारखा सुबक दिसत नाही.

मंगळापलीकडच्या गुरू आणि शनी या महाकाय ग्रहांना अनेक ‘चंद्र’ आहेत. मात्र या ग्रहांच्या पृष्ठभागावर उतरणं शक्य नाही. कारण ते वायुरूप आहेत. गुरूच्या सुमारे 93 नैसर्गिक उपग्रहांपैकी कोणता ना कोणता चंद्र सातत्याने ‘सूर्यग्रहण’ घडवतच असतो, परंतु गुरू, शनी सूर्यापासून अनुक्रमे 78 कोटी ते 1 अब्ज किलोमीटर अंतरावर असल्याने सूर्याला आपण पाहतो तसे ‘ख्रग्रास’ ग्रहण लागणं कठीण. तरीही गुरूचे अॅमॅल्थिआ, आयो, युरोपा, गॅनिमिड आणि पॅलिस्टो हे मोठे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकतात. हे उपग्रह गुरू आणि सूर्याच्या मधोमध सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्य त्यांच्या आड जातो. मात्र सूर्याचा ‘करोना’ किंवा प्रभामंडळ, बेलीज बीड्स, सोलार फ्लेअर, डायमंड रिंग अशी सुंदर दृश्यं या ग्रहणांच्या वेळी दिसणं शक्य नसतं.

गॅलिलिओ यांनी शोधलेल्या गुरूच्या चार चंद्रांपैकी ‘आयो’ची लंबगोल सावली गुरूवर पडल्याचा पह्टो अंतराळ दुर्बिणीने घेतला आहे. या सावलीच्या कक्षेत गुरूवर उभं राहता आलं असतं तर सूर्य ‘खग्रास’ झालेला दिसला असता, परंतु ते अशक्य आहे.

गुरूनंतरचा ग्रहमालेतला मोठा ग्रह शनी. त्याला अनेक ‘कडी’ (रिंग) असून ती छोटय़ा मोठय़ा पाषणांसह विविध आकाराच्या लहान उपग्रहांनी भरलेली आहेत. शनिपृष्ठावर उभं राहून सूर्याकडे पाहिलं तर कोणता ना कोणता पाषाण सूर्यबिंबावरून ‘सरकताना’ (ट्रान्झिट) दिसेल. मात्र शनीला प्रचंड आकाराचे उपग्रहसुद्धा आहेत. त्यापैकी मीमास, एन्सेलेडस, टेथिस, डायोने, ऱहेआ, टायटन अशा सात चंद्रांना सूर्याला ग्रहण लावता येतं. मात्र या सर्वांपेक्षा ‘जेनस’ या शनीच्या ‘चंद्रां’चं शनीपासूनचं अंतर आणि व्यास यांचं गणित सूर्य पूर्णपणे झाकण्याची करामत करू शकतं, पण असं फार क्वचित घडतं.

बाकी, युरेनस, नेपच्यून आणि खुजा ग्रह प्लुटो यांचे चंद्र सूर्यबिंबासमोर आले तरी त्यांचं अंतर सूर्यापासून इतपं दूर आहे की, ‘सूर्यग्रहण’ पेक्षणीय होण्यासारखा त्याचा आविष्कार असणं शक्य नाही. शनीच्या कडय़ांमधून पसार झालेल्या ‘पॅसिनी’ यानाने शनीवरच्या छाया-प्रकाशाचे विविध पह्टो मिळवले आहेत.

सूर्य, त्याभोवती फिरणारा ग्रह आणि त्या ग्रहाभोवती फिरणारा त्याचा नैसर्गिक उपग्रह यांची स्थिती केवळ वैश्विक ‘योगायोगाने’ आपली पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यासारखी असू शकते. चंद्र आपल्यापासून सुमारे 3 लाख 56 हजार ते 4 लाख 6 हजार किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, तर सूर्य आपल्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटरवर आहे. चंद्रगोल आकाराने पृथ्वीच्या एक चतुर्थांश आहे, तर चंद्रापेक्षा सूर्य आकाराने 400 पट मोठा आहे आणि सूर्य पृथ्वीपासून चंद्राच्या तुलनेत 400 पट अंतरावर आहे. त्यामुळे या आपल्या छोटय़ा उपग्रहाचं बिंब पौर्णिमेला आपल्याला ‘सूर्याएवढं’ दिसतं.

खग्रास सूर्यग्रहण मात्र अमावस्येलाच होऊ शकतं. त्या वेळी पृथ्वी-सूर्याच्या मधोमध आलेला चंद्राचा अप्रकाशित भाग आपण पाहत असतो तो सूर्यावर हळूहळू ‘सरकताना.’ चंद्राची सावली चंद्रापलीकडच्या सूर्यामुळे पृथ्वीवर पडते. ती जिथे पडते, त्या दाट छायापट्टय़ातून ‘खग्रास’ सूर्यग्रहण दिसते. मात्र चंद्रावरच्या दऱयाडोंगरांच्या अस्तित्वाने पिंचित सूर्यप्रकाश लाल मण्यांसारखा चंद्रबिंबाच्या सभोवती दिसू शकतो. त्यापूर्वी सूर्य पूर्ण झाकला जाण्याआधी आणि ग्रहण सुटण्याच्या क्षणी ‘हिऱयाची अंगठी’सुद्धा दृष्टीस पडते.

इतपं लोभस खग्रास सूर्यग्रहण सूर्यमालेतील अन्य ग्रहांवरून शक्य नाही. कारण असा वैश्विक योगायोग कुठेच साधला जात नाही. त्यामुळे निसर्ग आपल्याला ज्या विलक्षण गोष्टी न मागता देतो त्याचा आस्वाद घ्यायला हवा. आमच्या अनेक ‘खगोल मंडळीं’नी या वेळी तो अमेरिकेतून ‘प्रत्यक्ष’ घेतला आणि त्याची उत्तम नोंदही केली.