सोहळा-संस्कृती – भीमरूपी महारुद्रा

>> गुरुनाथ तेंडुलकर

हनुमान म्हणजे बुद्धिमान. मरुत म्हणजे वायूचा पुत्र म्हणून मारुती. सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत गेल्यानंतर तिथल्या वनांचा विध्वंस केला म्हणून वनारी. अंजनीचा पुत्र म्हणून अंजनीसूत. रामाचा दूत म्हणून रामदूत. पीवादळाप्रमाणे विध्वंस घडवून आणण्याची क्षमता असलेला म्हणून प्रभंजन. महाबली प्रचंड बलशाली. लक्ष्मणाला संजीवनी दिली म्हणून प्राणदाता.

माझ्याच लेखणीतून उतरलेली प्रभू हनुमंताची आरती

जयदेव जयदेव जय जय हनुमंता । 

तू असता मजसंगे नाही भयचिंता ।। धृ ।। जयदेव जयदेव 

समुद्र लंघुनि अवघा शोधियली सीता । 

मूर्च्छित रणी लक्ष्मण त्या संजीवन देता । 

लंकेतिल विजयाचा तू कर्ता-धर्ता 

परि तव चित्ती लवही नाही अहंता ।।1।। जयदेव जयदेव 

बलभीमा बल अतुलित अन्य नसे उपमा । 

पवनपूत अंजनीसुत कृतांत संग्रामा । 

बुद्धी शक्ती युक्ती तव, सहाय्य श्रीरामा । 

महावीर बजरंगा अगणित तव महिमा ।। 2 ।। जयदेव जयदेव 

हुंकार भयंकर तव शेषही थरथरला । 

अगणित राक्षसगण परि निपात केला । 

जाळली लंका म्हणूनी रावण डगमगला । 

सज्जन बिभीषण बंधू अभयंकर दिधला ।।3।। जयदेव जयदेव

अंजनीच्या सूता, श्रीरामाच्या दूता । 

पडलो संकटी भारी, तारी तू आता । 

अन्य कुणी ना जगती तुजविण मज त्राता ।। 

धाव पाव रे झडकरी देवा हनुमंता ।। 4 ।। जयदेव जयदेव  

जय श्रीराम…  

बजरंग बली की जय… 

श्री समर्थ रामदासस्वामींनी रचलेल्या मारुती स्तोत्रातील प्रत्येक शब्द जाणून घेतला तर त्यात आपल्याला हनुमंतांची अनेक नामे आणि त्या प्रत्येक नामामागचे अर्थ उलगडत जातात. अगदी सुरुवातीलाच समर्थ म्हणतात, भीमरूपी. भीम या शब्दाचा अर्थ प्रचंड आकाराचा. महारुद्रा (भगवान शिवशंकराने विष्णूदेवांच्या सहाय्यासाठी अनेक अवतार धारण केलेत. त्या अवतारांना रुद्र असंही म्हटलं जातं.) त्या सर्व रुद्रांमधील सर्वश्रेष्ठ रुद्ररूप म्हणजे हनुमान!

हनुमंताची अशी अनेकविध नावं आहेत. हनुमंताला बजरंग असंही म्हणतात. बजरंग हा शब्द वज्र-अंग शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. वज्रासमान अभेद्य शरीर धारण करणारा वज्र-अंग म्हणून बजरंग. आपल्या सनातन हिंदुस्थानी संस्कृतीनुसार हनुमान ही देवता शक्ती, बुद्धी, भक्ती, ज्ञान, वैराग्य, आयुष्य आणि आरोग्याची देवता मानली जाते. कोणत्याही व्यायामशाळेत जा. प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात मारुतीची तस्वीर किंवा मूर्ती विराजमान असतेच असते. हनुमंत ही देवता केवळ हिंदूधर्मापुरती मर्यादित नाही. अनेक अहिंदूदेखील बजरंगबलीची उपासना करतात, तर अशा या हनुमंताचा जन्म कधी आणि कुठे झाला याबद्दल अलीकडेच ज्योतिषशास्त्रीय पुरावे उपलब्ध झाले आहेत. या पुराव्यानुसार हनुमंताचा जन्म साधारण पंचाऐंशी लक्ष अठ्ठावन्न हजार एकशे बारा वर्षांपूर्वी त्रेतायुगात झाला. तो दिवस होता मंगळवार आणि तिथी होती चैत्र पौर्णिमा. चित्रा नक्षत्र आणि मेष लग्नावर सकाळी सूर्योदयाच्या वेळी हिंदुस्थान देशात हनुमान जन्माला आला. ज्या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला ते ठिकाण आज आपल्या देशातील हरयाणा राज्यात कैथल जिह्यात आहे. आजही त्याला कपिस्थल म्हणून ओळखलं जातं.

हनुमंताचे वडील केसरी ऊर्फ मरुत हे वानरवंशातील राजा होते. त्यांच्या पत्नीच्या अंजनीच्या पोटी जन्मलेला ज्येष्ठ पुत्र हनुमान. हनुमानाला मतिमान, गतिमान, श्रुतिमान, केतुमान आणि धृतिमान असे पाच भाऊदेखील होते. हनुमंताबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. अगदी जन्मल्याबरोबर त्याने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केलं इथपासून ते लक्ष्मणाला संजीवनी आणण्यासाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला इथपर्यंत. सीतेने दिलेल्या रत्नहारातील प्रत्येक रत्न फोडून त्यात राम नाही म्हणून फेकून दिला आणि स्वतची छाती फाडून हृदयातील राम दाखवला वगैरे. या सर्व कथा आपल्याला आपल्या पूर्वसुरींनी सांगितल्या आहेत. त्यात अनेक भाष्यकारांनी आपापल्या कल्पनेची भर घालून त्या अशा प्रकारे सांगितल्या की, आज ऐकताना त्या अगदी खोटय़ा वाटतात. म्हणूनच या पौराणिक कथांमागील नेमकी वस्तुस्थिती जाणून घेणं आवश्यक आहे. आज या ठिकाणी अशाच एका कथेमागचं वास्तव आपण समजून घेऊया.

सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंताने लंकेत प्रवेश केला. तिथे सीतेला प्रभू श्रीराचंद्रांचा निरोप सांगितला आणि रावणाला आपल्या शक्तीची चुणूक दाखवण्यासाठी अशोकवनातील अनेक झाडं मुळापासून उपटून विध्वंस आरंभला. त्यानंतर रावणाच्या मुलाने मेघनादाने हनुमंताला बंदी बनवून राजसभेत रावणासमोर आणलं. रावणासमोर हनुमंत शेपटीचे वेटोळे घालून उंचावर बसला. संतापलेल्या रावणाने हनुमंताची शेपटी जाळण्याची शिक्षा सुनावली. त्यानुसार हनुमंताच्या शेपटीला  वस्त्र गुंडाळून, तेल ओतून शेपटीला आग लावण्यात आली. शेपटीला आग लागलेला हनुमंत राजसभेतून सैरावैरा पळत सुटला आणि त्याने लंकेतल्या अनेक प्रसादांना, इमारतींना, घरादारांना आग लावली. ही कथा आपण सगळय़ांनी ऐकली, वाचली आहे. रामायणावरील अनेक मालिका-चित्रपटांतूनही हेच दाखवलं आहे. पण या कथेमागची वस्तुस्थिती काय आहे? ती वस्तुस्थिती अशी की, रावणाने भरदरबारात हनुमंताचा शिरच्छेद करण्याची शिक्षा फर्मावली. त्या वेळी तिथे उपस्थित असलेला रावणाचा धाकटा भाऊ बिभीषणाने भर दरबारात विरोध करून हा आपला शत्रू नसल्याचं सांगितलं. अयोध्येचा युवराज प्रभू श्रीरामचंद्रांचा राजदूत आहे, तर राजदूताला शासन करणं हे न्यायसंमत होणार नाही. ते धर्माचरणाच्या विरोधात होईल. बिभीषणाने भर सभेत हे निक्षून सांगितल्यानंतर तिथे उपस्थित अनेक मान्यवरांनी बिभीषणाला दुजोरा दिला. अखेर रावणाला त्या विद्वान सभाजनांसमोर नमतं घ्यावं लागलं आणि त्याने हनुमंताची बिनशर्त मुक्तता केली. हनुमंत हे सगळं अवलोकन करत होता. तिथल्या प्रत्येक नगरवासीयाच्या तोंडातून निघणारा शब्द आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव सूक्ष्म नजनेने टिपत होता.

राजदरबारातून सुटका झाल्यानंतर हनुमंताने त्या सर्वजणांची वैयक्तिक भेट घेतली. बिभीषणाला आपली भूमिका पटवून सांगत त्याला प्रभू श्रीरामांच्या बाजूने वळवून घेतलं. रावणाच्या असुरी कायद्याने त्रस्त झालेल्या दरबारातील न्यायप्रिय मानकऱयांची संघटना बांधली. ते सर्वजण नवीन राजा म्हणून बिभीषणाला स्वीकारतील इथपर्यंत सगळी व्यवस्था हनुमंताने लंकेत निर्माण केली. लंकेतील जनसामान्यांच्या मनात रावणाबद्दल क्षोभ निर्माण केला. विद्रोहाची आग भडकवली. प्रभू रामचंद्रांच्या लंकेवरील आाक्रमणाआधीच लंकेतील जनसामान्यांच्या मनात रावणाबद्दल चीड निर्माण झाली होती. हनुमंताने लंका जाळली याचं हे वास्तव उत्तर आहे.

या हनुमान जयंतीला हनुमंताचं चरित्र-चित्र हृदयात साठवा आणि बलोपासनेला आरंभ करा. ‘धर्मो रक्षति रक्षिताः’ धर्म टिकवण्यासाठी सर्व प्रकारचं बल आवश्यक असतं. त्यात बाहुबल, बुद्धिबल, शक्ती आणि युक्तीदेखील आहे. या सर्वप्रकारच्या बलासाठी बलभीमाला साद घालू या.