माझा फिटनेस फंडा

>> मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज

अभिनेता संजय शेजवळ जबदरस्त फिटनेससाठी ओळखला जातो. कटाक्षाने पथ्यं पाळणे, शिस्तबद्ध जीवनशैली याबाबत तो सजग असतो.

अभिनेता संजय शेजवळ फिटनेस आणि आरोग्याविषयी सजग आहे. एका मध्यमवर्गीय घरातून आलेला असल्यामुळे त्याच्यासाठी भरपूर स्पर्धा होती. सगळय़ांमध्ये आपण स्वतःचे वेगळेपण दाखवून देण्यासाठी, शिस्तबद्ध जीवनपद्धती आणि त्यासाठी स्वतःला फिट ठेवणे हे गरजेचे होते. सकाळी उठून जिमला जाणे किंवा योग करणे… त्यातले काही जमले नाही तरीही रनिंग किंवा सायकलिंग तरी करावे, या सवयी त्याने लावून घेतल्या. सोबत पौष्टिक खाण्याकडे त्याचा जास्त भर आहे. जरी तो बाहेर असला तरी घरचे जेवण किंवा तेथील पारंपरिक जेवण शोधतोच. आणि हो, वेळेवर झोपतो. ‘अॅन अॅक्टर शुड बी अॅन एथिलिट फिलोसोफर’ हे त्याने कुठेतरी ऐकलं होतं, तेच त्याने कायम लक्षात ठेवलंय. मराठी अभिनेत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याला बदलायचा आहे. स्वतःला फिट ठेवून ते सिद्ध करायचा त्याचा प्रयत्न आहे.

 संजय रोज सकाळी ओट्स खातो. त्यात प्रोटिन्स खूप असते. त्याच्या मते, तुम्ही वर्कआऊट करत असाल तर व्हेय प्रोटिन खायला काहीही हरकत नाही. याशिवाय सलाड, भाज्या, जास्त करून हिरव्या भाज्या, नाचणी किंवा ज्वारीची भाकरी रोजच्या जेवणात असते. कधी बाजरीची भाकरी आणि भात असतो. आईच्या हातची मेथीची भाजी तर त्याची फेव्हरेट.

संजय सांगतो, भात खाल्ल्याने माणूस जाड होतो, असा एक गैरसमज आहे. भात प्रमाणात खाल्ला आणि दोन कार्बस असलेले पदार्थ एकत्र खाल्ले नाहीत तर वजन वाढणार नाही. साखर खाणे टाळावे. कारण जेवढी साखर आपल्या शरीराला गरजेची असते ती आपल्याला जेवणातून मिळते तर त्याव्यतिरिक्त काहीही गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. संजयला स्वयंपाक करायला खूप आवडतो. अगदी शाकाहारी-मांसाहारी दोन्ही पदार्थ त्याला उत्तम जमतात.

 स्ट्रीट फूड आणि त्याचे नाते खूप दूर आहे. संजयचे म्हणणे आहे, जेवढे हेल्दी खाणार तितके उत्तम. सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला त्रास होईल, पण पुढे जाऊन ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. फायदा हा की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसायला लागणार. तुम्हाला हवे ते कपडे घालायला मिळतील. सगळेच कपडे तुमच्यावर छान दिसणार. आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज येतो आणि आपोआप तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.