सिनेमा; गाडी बुला रही है…

>>प्रा. अनिल कवठेकर

‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी’ या गाण्यातील रेल्वे आता आपल्या संस्कृतीचा एक भाग झाली आहे. अनेक चित्रपटांमध्ये नायक-नायिका किंवा कोणीही प्रवास करून आल्याचं दाखवण्यासाठी किमान रेल्वेचं एक दृश्य असतं आणि असायचंही. या रेल्वेचं आणि यशस्वी चित्रपटांचं एक अतूट नातं आहे.

प्रवासाच्या सगळ्या वाहनांमध्ये प्रवास करण्यात खरी रंगत आणि गंमत आणणार एकमेव वाहन म्हणजे रेल्वे होय. या रेल्वेची म्हणजे आगीन गाडीची ओळख आपल्याला अगदी बालवयातच झालेली असते. आपण सगळे त्या गाडीच्या प्रेमात पडतो, कारण ती गाडी आपल्याला मामाच्या गावाला घेऊन जाते. ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया…’ ही आगीनगाडी आपल्या संस्कृतीचा एक भाग झालेली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये नायक-नायिका किंवा कोणीही प्रवास करून आल्याचं दाखवण्यासाठी किमान रेल्वेचं दृश्य असायचं. या रेल्वेचं आणि यशस्वी चित्रपटांचं एक अतूट नातं आहे. अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये रेल्वेचं एक तरी दृश्य असल्याचं दिसून येतं.

मनोरंजनामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘शोले’च्या उदाहरणापासून आपण सुरुवात केली तर लक्षात येतं की, पहिलंच दृश्य कोळशाच्या इंजिनावर आहे. शिवाय शेवटच्या दृश्यात वीरू गब्बरला मारून गावातून पुन्हा शहराकडे जायला निघतो तेव्हा रेल्वेच्या डब्यात बसंती त्याची वाट पाहत आहे आणि त्यांच्या पुढच्या जीवन प्रवासाला सुरुवात होते. इथे संवादाची गरज नाही. ठाकूर जेव्हा वीरू आणि जयदेवला घेऊन पोलीस स्टेशनकडे ट्रेनमधून निघालेले असतात त्यावेळी त्यांच्यावर होणारा डाकूंचा हमला आणि डाकूंसोबत ट्रेनवर झालेली हाणामारी. वीरू आणि जय जेव्हा ठाकूरला भेटायला येतात तेव्हाही रेल्वेनेच येतात आणि एवढेच नाही तर वीरू जेव्हा बसंतीकरता गाणं म्हणतो तेव्हा त्या गाण्यांमध्येही एक रेल्वेच्या जाण्याचा संदर्भ येतो. ‘कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है, स्टेशनसे गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है’ चित्रपटांमध्ये रेल्वेचे येणे हे त्या चित्रपटातील दृश्याला वास्तवाकडे अप्रत्यक्षपणे घेऊन जाते.

शोले या चित्रपटाइतकाच अनेक वर्षे एकाच थेटरला चिकटून राहिलेला चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातही नायक आणि नायिकेची ओळख रेल्वेच्या डब्यात इंग्लंडमध्ये होते. रेल्वे चुकणार असते तेव्हा नायक तिला हात देऊन ट्रेनमध्ये घेतो आणि या चित्रपटाचा शेवट हा आपल्या देशातील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर होतो. ज्या ठिकाणी अमरीश पुरीचा तो सुप्रसिद्ध इमोशनल संवाद आहे. ‘जा सिमरन जा इस लडके से ज्यादा प्यार तुझे और कोई कर नही सकता.’ ही दोन्ही दृश्यं त्या चित्रपटाला एक पूर्णत: देतात.

सनी देओलचा ‘गदर’ नावाचा जो पहिला चित्रपट आला होता. त्या चित्रपटातील शेवटचे दृश्य पूर्णपणे पाकिस्तानमधून भारतात येणाऱया ट्रेनवर चित्रित करण्यात आले होते आणि हा त्या चित्रपटातला अतिशय सुंदर असा क्लायमॅक्स होता. अनेकदा असे लक्षात येते की, चित्रपटातील ट्रेन ही त्या चित्रपटाच्या आशयाला किंवा भावनेला एक परिणामकारक असे ठोस रूप द्यायला सहाय्यभूत होत असते. सलमान खानचा अतिशय गाजलेला चित्रपट बॉडीगार्ड या चित्रपटाचे कथानक इतर पटकथेपेक्षा नक्कीच वेगळे होते. इथेही प्रेमाचा त्रिकोण होता; पण तो सस्पेन्स होता. या चित्रपटातही शेवटचा क्लायमॅक्स हा रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा आहे जयसिंगपूर स्टेशनवर सलमान खान आपल्या मुलासोबत येतो. तो मुलगा त्याच्या आईची डायरी तिथल्या प्लॅटफॉर्मवरील कचराकुंडीत टाकतो, पण एकेकाळी अत्यंत चाणाक्ष बॉडीगार्ड असणाऱया सलमान खानच्या नजरेतून ते सुटत नाही. तो ती डायरी वाचतो. ट्रेनच्या प्रवासात त्याला सगळं सत्य कळतं. इथून पुढे त्यांचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. हेच सांगणारा हृदयाशी कुठेतरी संवाद करणारं हे सगळं दृश्य शूट करण्यासाठी ट्रेन, प्लॅटफॉर्म याशिवाय दुसरा कोणताही सुंदर लोकेशनचा पर्याय लेखकालाही नव्हता आणि दिग्दर्शकाला नव्हता.

तसाच शाहरुख खानचा आणखी एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है.’ प्रेमाचा त्रिकोण बॉलीवूड चित्रपटसृष्टीला नवीन नाही. या चित्रपटातील अंजली जेव्हा राहुलला सोडून जाते तेव्हा ते दृश्यही एका प्लॅटफॉर्मवर घेतलेले आहे. टीना उभी आहे. अंजली ट्रेनमधून निघालेली आहे. राहुल तिला विनंती करतोय. राहुलचा गोंधळ उडालेला आहे. त्याला नेमकं कळत नाही की, आपण तिला मैत्रीण म्हणावे की काय म्हणावे. त्या क्षणी टिनाला कळतं या दोघांमधली मैत्री वेगळी आहे. हा सगळा प्रसंग ट्रेन हळूहळू सुरू होते. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज येतो. ट्रेन पुढे पुढे निघते. त्या दोघांचा संवाद होतो. त्या दोघांकडे आता बोलायला वेळ नाही. हे सगळं दाखवण्यासाठी ट्रेनशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही, हे दिग्दर्शकाला कळतं आणि म्हणूनच ते दृश्य आपल्या लक्षात राहतं.

आमिर खानचा ‘तलाश’ नावाचा एक चित्रपट आला होता. एक अत्यंत रहस्यमय अशी कथा असणारा हा चित्रपट होता. आणि या चित्रपटातही जेव्हा तैमूर म्हणजे नवाजुद्दीन आपल्या प्रेयसीला घेऊन पळून जाणार असतो तेव्हा त्याला ठार मारण्यासाठी आलेले भाडोत्री गुंड त्यांचा पाठलाग करतात. तो पाठलाग प्लॅटफॉमवर आणि लोकलमध्ये केलेला होता आणि ते दृश्यही तसं खूपच लक्षात राहण्यासारखा झालेलं होतं. आमिर खानच्या अशाच ‘गुलाम’ नावाच्या एका चित्रपटातही समोरून येणाऱया लोकलसमोर धावणारा आमिर खान त्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रभासचा येऊन गेलेला ‘राधेश्याम’ नावाचा चित्रपट यातही एका सुंदर ट्रेनचे दृश्य चित्रित करण्यात आलेले आहे. ‘नाचो नाचो’ हे नाचण्याकरता शरीरामध्ये, मनामध्ये जोश निर्माण करणारे थकायला लावणारे गाणं ज्या चित्रपटाने दिले त्या ‘आर आर’ या चित्रपटातही मालगाडीच्या दृश्याचा समावेश होता. नसिरुद्दीन शहाच्या ‘वेन्सडे’ चित्रपटातील त्याचा रोजचा लोकलचा प्रवास. ‘लंच बॉक्स’ चित्रपटामध्ये असलेली लोकल. अभय देवलचा ‘एक चालीस की लास्ट लोकल’ नावाचा चित्रपट ‘धूम’ चित्रपटांमधील ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’चा साडेपाच मिनिटं चालणारे रोमांचकारी दृश्य. वाळवंटातून एक राजेशाही ट्रेन चाललेली आहे. त्या वेगाने जाणाऱया ट्रेनच्या छतावर विमानामधून पॅराशुटच्या साह्याने ऋतिक उतरतो. ट्रेनमधील मुकूट चोरतो. वेगाने जाणाऱया ट्रेनवर होणारी हाणामारी. पुन्हा ट्रेनला लटकून वाळवंटावर स्लाइडिंग करणे. पुन्हा ट्रेनच्या ट्रकवर होणारं स्लाइडिंग ही सगळी जिवाचा थरकाप उडवणारी दृश्यं ‘धूम टू’ या चित्रपटातील महत्त्वाच्या अॅक्शन दृश्यांपैकी दृश्यं आहेत. जी ट्रेनशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते. शिवाय दृश्याचे एक वेगळेपण असे आहे की, आजूबाजूला तुम्हाला काही दिसत नाही. फक्त वाळवंट आणि वाळवंट. त्यामुळे त्या दृश्याची परिणामकारकता आणखीन वेगळीच जाणवते. ज्या ज्या हिंदी चित्रपटात ट्रेन आलेली आहे तो हिट झालेलाच आहे, असे म्हणता येईल, पण ‘द बर्निंग ट्रेन’ नावाचा हिंदी चित्रपट जो पूर्णपणे ट्रेनवर आधारलेला होता. तो चित्रपट मात्र तेवढय़ा प्रमाणात हिट होऊ शकला नाही. हे एक वेगळे गणित आपल्या लक्षात येत नाही. ट्रेनशी संबंधित असणाऱया चित्रपटांची टायटलसुद्धा आहेत जसे चेन्नई एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस, ट्रेन टू पाकिस्तान, कलकत्ता मेल द ट्रेन, द बर्निंग ट्रेन, राजधानी एक्सप्रेस, रेल्वे प्लॅटफॉर्म, हाफ तिकीट इत्यादी.

असा हा जीवनाला संपन्न आणि सुंदर करणारा रेल्वेचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातूनही तितकाच रंजक ठरतो.
(क्रमश:)
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)