आभाळमाया – ‘पिधान’ पाहिले!

>> वैश्विक, [email protected]

रात्रभर जागून, नुसत्या डोळय़ांनी किंवा दुर्बिणीद्वारे अवकाशाचं निरीक्षण करण्यात काय आनंद मिळतो ते केवळ अनुभवल्यावरच समजतं. आता सत्तरीनंतर जागरण सोसत नसले तरी एखादी खगोलीय घटना पाहण्याची उत्सुकता तेवढीच असते. परवा 5 तारखेच्या पहाटे अशीच एक ‘पर्वणी’ होती. ज्येष्ठा नक्षत्र किंवा तारा चंद्राआड दडून काही काळाने बाहेर येणार होता. पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्राचं सुरू झालेलं पिधान किंवा ऑकल्टेशन न्याहाळण्याची संधी तरुण खगोल अभ्यासक अर्चित याने आठवण करून दिल्याने लाभली. मुंबईतल्या मुलुंड उपनगरातल्या अर्चितच्या इमारतीवरून हे पिधान पाहिलं. वास्तविक मुंबईसारख्या सतत प्रकाशमान असणाऱया महानगरातून आकाशदर्शन अशक्यच, परंतु चतुर्थीचा चंद्र आणि लाल रंगाचा ठळकपणे दिसणारा परिचित ज्येष्ठा नक्षत्राचा तारा यामुळे या प्रकाशनगरीतूनही हे पिधान छान दिसलं, रेकॉर्ड करता आलं. अर्चितने फोटोही घेतले.

पिधान म्हणजे निरीक्षकाच्या दृष्टीसमोरची एखादी वस्तू मध्ये येणाऱया दुसऱया वस्तूमुळे काही काळ अडवली जाऊन अदृश्य होणे. वृश्चिक राशीतला ज्येष्ठा (अॅन्टेरेस) तारा परवाच्या पहाटे असाच चंद्राआड लपला तो चंद्राच्या गतीमुळे. त्यातही तो चवथीच्या (चतुर्थीच्या) चंद्राआड दडल्याने चंद्रकोरीच्या प्रकाशमान भागाकडून दृष्टिआड होताना दिसला. त्यापेक्षा चंद्राच्या काळोख्या भागाच्या बाजूने पुन्हा प्रगटताना दिसला तो क्षण अधिक आनंदाचा होता. पहाटे साधारण 4 वाजून 40 मिनिटांनी ज्येष्ठा तारा चंद्रकोरीमागे गेला आणि 5 वाजून 55 मिनिटांनी पुन्हा चमकत अवतीर्ण झाला. हा सगळा अवकाशी खेळ मनोरंजक आणि ज्ञानवर्धकही होता.

आपल्या संस्कृतीला राशीपूर्वीपासून नक्षत्रांची कल्पना होती. रात्रीच्या आकाशाची 27 भागांत विभागणी करून एकेका नक्षत्राचा काळ ठरवला गेला. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी…ते रेवतीपर्यंतची 27 नक्षत्रे आजीने आमच्या लहानपणीच पाठ करून घेतली होती. त्याचा उपयोग आता आकाशदर्शनाच्या वेळी होत असतो.

गॅलिलिओपूर्व काळातली जगातली सर्व आकाश पिंवा अवकाश निरीक्षणं केवळ नजरेनं व्हायची. त्या काळात कुठेही रात्र काळोखीच असायची. कारण विजेच्या तेजस्वी दिव्याचा शोध 1892 मध्ये लागला. त्यामुळे अगदी घराच्या अंगणातूनही तारांगण खच्चून भरलेलं दिसायचं. आता शहरी भागात अंगणेही गेली आणि आकाशही डोळे दिपवणाऱया उजेडानं व्यापलं. त्यातच भर म्हणून धुराचं प्रदूषण. मग तारे कुठले दिसायला. पण 1985 मध्ये आम्ही खगोल मंडळी मुंबईपलीकडच्या वांगणी गावात आकाशदर्शनासाठी जायला लागलो तेव्हा तिथून मात्र आकाशगंगेचा धूसर पट्टाही नुसत्या डोळय़ांनी स्पष्ट दिसायचा. आताच्या काळात मुंबईतून पिधान पाहता आलं हेच विशेष.

यानिमित्ताने ज्येष्ठा ताऱयाची माहिती घेऊ. आपल्या प्राचीन नक्षत्र मालिकेतली 27 नक्षत्रे 12 राशींच्या आकारांत बसवली तर प्रत्येक राशीत सुमारे अडीच नक्षत्रे सामावतात. वृश्चिक या सुंदर आकाराच्या राशीच्या विंचवासारख्या आकारात अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ ही तीन नक्षत्रे असतात. मे महिन्याच्या अखेरीस आपल्याकडून ही रास अवकाशात अधिक चांगली दिसते. या राशीतला ज्येष्ठा पिंवा अॅन्टेरेस हा लाल महातारा 10 लाख वर्षांनी आणखी वाढत जाऊन त्याचं तेजोमेघात (सुपरनोव्हामध्ये) रूपांतर होऊ शकतं. मृग नक्षत्रामधला ‘बेटेलज्यूस’ पिंवा काक्षी तारा तर कोणत्याही क्षणी स्पह्ट होऊन प्रसरण पावेल असं म्हणतात. तारा मृत्यूपंथाला लागल्याचं लक्षण म्हणजे त्याचा रंग लाल दिसू लागणं. त्यातलाच एक उमेदवार आहे ज्येष्ठा.

हा तारा सूर्याच्या 12 पट वस्तूमानाचा असून त्याचा व्यास 1360 लाख किलोमीटर आहे. हा रूपनिकारी (व्हेरिएबल) तारा असल्याने त्याचा व्यास सुमारे 19 टक्क्यांपर्यंत कमी-जास्त होतो. तो लाल दिसत असल्याने मंगळ ग्रहासारखा वाटतो. (काक्षी तारासुद्धा तसाच वाटतो.) म्हणून प्राचीन ग्रीक निरीक्षकांनी त्याला एरेस (मंगळ) याचा विरोधी तारा अॅन्टेरेस असं नाव दिलं. हिंदुस्थानी निरीक्षकांनी त्याचं विशालत्व लक्षात घेऊन त्याला ज्येष्ठा म्हटलं. आपल्या पृथ्वीपासून ज्येष्ठा तारा 555 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या ताऱयाला एक अंधूक जोडतारा (बायनरी) असून त्या दोघांमधलं अंतर सूर्य-पृथ्वी अंतराच्या 530 पट आहे. त्याला 13 एप्रिल 1819 रोजी जोहॅनबर्ग यांनी शोधले, पण मध्येच हा तारा दिसेनासा झाल्याने शंका निर्माण झाली. शेवटी 1847 मध्ये विल्यम डॉवेस यांनी त्याचं रीतसर मापन केलं. हा तारा प्रभावी दुर्बिणीद्वारेच दिसू शकतो. 1852 मध्ये अचानक अतितेजस्वी झालेल्या ज्येष्ठा ताऱयाला ब्राझील देशाच्या ध्वजावर स्थान मिळाले आहे. तिथल्या 27 राज्यांपैकी हा ज्येष्ठा तारा पिऑइ राज्याचं प्रतीक मानलं जातं. अॅन्टेरेच्या नावे एक कार आणि संगीताचा अल्बमही आलेला आहे. चिनी लोकांनी आगीनतारा (फायरी स्टार) असं नाव दिलेला ज्येष्ठा पुन्हा चंद्राआड जाईल, पण पावसाळय़ात आपल्याकडून त्याचं पिधान दिसणं कठीण. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ताऱयांची किंवा ग्रहांची चंद्रामुळे होणारी पिधाने जरूर पाहा. त्याची यादी गुगलवर सापडेल. 5 मे रोजी मंगळ, तर 31 मे रोजी शनी ग्रह चंद्राआड जाणार आहे.