नेपाळी गोरखा, वॅग्नर ग्रुप आणि हिंदुस्थान

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

रशियात परिस्थिती कशीही असली तरी वॅग्नर ग्रुप आणखी वाढत असून जगाच्या अनेक भागांतून या ग्रुपमध्ये सैन्य भरती सुरू असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील गोरखा तरुणदेखील वॅग्नर ग्रुपमध्ये सामील होत आहेत. नेपाळमधील गोरखांना मॉस्कोत जायची गरज का भासली? रशियाच्या वॅग्नर ग्रुप सैन्यदलात भरती होण्याचे काय फायदे आहेत आणि याचा हिंदुस्थानशी संबंध काय? याचे विश्लेषण जरुरी आहे.

गेल्या काही काळात नेपाळमधील गोरखा रशियामध्ये जाऊन वॅग्नर ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. किती नेपाळी युवकांनी रशियाच्या खासगी सैन्यदलात सामील होण्याचा निर्णय घेतला याची आकडेवारी समोर आलेली नाही, पण नेपाळी युवक रशियात जात आहेत. गोरखा हे नेपाळमधील योद्धे म्हणून ओळखले जातात. अनेक शतकांपासून त्यांनी आपल्या युद्धकौशल्याने पराक्रम गाजवला आहे. 1815 सालापासून नेपाळी गोरखा ब्रिटिशांच्या खांद्याला खांदा लावून लढले. हीच प्रथा हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुरू राहिली. आतादेखील नेपाळमधील एक हजार युवकांना ब्रिटिश सैन्यदलात अधिकृतपणे प्रवेश दिला जातो.

हिंदुस्थानात अंदाजे 35 हजार नेपाळी सैनिक

हिंदुस्थानी गुरखा रेजिमेंटमध्ये नेपाळी सैनिकांची भरती केली जात होती. त्यात 60 टक्के सैनिक नेपाळी असतात तर 40 टक्के सैनिक हिंदुस्थानी गुरखे असतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर नोव्हेंबर 1947 मध्ये ब्रिटन-हिंदुस्थान-नेपाळ त्रिपक्षीय करारानुसार गुरखा रेजिमेंट ब्रिटिश आणि हिंदुस्थानी सैन्यांमध्ये विभागल्या गेल्या. 6 गुरखा रेजिमेंट हिंदुस्थानात आल्या, ज्यामध्ये 11 गुरखा रायफल्स आणखी एक रेजिमेंट वाढवण्यात आली. अनेकदा हिंदुस्थानी लष्कराची वैद्यकीय पथके नेपाळला भेट देतात. नेपाळी सैनिकांना निवृत्तीनंतरही हिंदुस्थानी सैनिकांसारखीच पेन्शन मिळते. हिंदुस्थानी लष्कर नेपाळच्या गावांमध्ये लहान पाणी आणि वीज प्रकल्पांसह कल्याणकारी प्रकल्पही चालवते. त्यामुळे नेपाळमध्ये हिंदुस्थानी सैन्यमध्ये भरती होण्याकडे नेहमीच कल राहिलेला दिसतो. हिंदुस्थानात सध्या अंदाजे 35 हजार नेपाळी सैनिक सात रेजिमेंटमध्ये सेवा देत आहेत.

‘वॅग्नर’मध्ये भरती होण्याचे कारण

रशिया आणि नेपाळमध्ये काही अधिकृत करार झालेला नाही, पण अनेक नेपाळी युवक रशियातील खासगी सैन्यदलात भरती होण्यासाठी जात आहेत. नेपाळी गोरखांना रशियात जाऊन खासगी सैन्यदलात भरती होण्याची गरज का भासली, याची काही कारणे समोर येतात. 16 मे रोजी रशियाने रशियन नागरिकत्व प्राप्त करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली. रशियाने केलेल्या नव्या कायद्यानुसार जी व्यक्ती रशियन सैन्यदलात सेवा देतील, त्यांना रशियन नागरिकत्व बहाल केले जाईल. त्यासाठी त्यांचा रहिवासी परवाना विचारात घेतला जाणार नाही.

याशिवाय रशियन सैन्यात भरती होण्यासाठी परदेशी नागरिकांना आता रशियन भाषा यावी अशी अट नाही. यामुळे नेपाळी युवकांना रशियन खासगी सैन्यदल आकर्षित करत आहे. नेपाळमध्ये सध्या बेरोजगारीचा दर 11.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अनेक गोरखा देश सोडून इतरत्र रोजगाराच्या शोधात जात आहेत. उच्च वेतनामुळे गोरखा वॅग्नर ग्रुपमध्ये जात आहे.

एक नेपाळी युवक रशियन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेला होता, मात्र त्याचा व्हिसा समाप्त झाला. मग त्याच्यासमोर त्यानंतर दोनच पर्याय होते-नेपाळमध्ये जाऊन बेरोजगार होणे किंवा रशियन सैन्यात भरती होणे. रशियन सैन्यात भरती झाल्यानंतर या युवकाला नेपाळी रुपयांमध्ये 50 हजार एवढे वेतन मिळत आहे, तसेच त्याला विमा संरक्षण देण्यात आले आहे. रशियात गेल्यामुळे तेथून युरोपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो. नेपाळी गोरखांना चांगल्या जीवनशैलीची आस लागल्यामुळे हा मार्ग त्यांना अधिक जवळचा वाटतो. “मी फ्रेंच सैन्यदलात भरती होण्याचा विचार करत होतो, मात्र त्यांची निवड प्रक्रिया लांबलचक आहे आणि युरोपमध्ये जाणे कठीण काम आहे. रशिया त्या तुलनेत खूप सोपे प्रकरण आहे,’’ अशी माहिती नुकत्याच वॅग्नरमध्ये भरती झालेल्या युवकाने माध्यमांना दिली आहे. नेपाळी युवक वॅग्नर ग्रुपकडे वळण्याचे आणखी एक कारण हिंदुस्थानशी संबंधित आहे. या आधी हिंदुस्थानी सैन्यदलात गोरखांची भरती होत होती, मात्र हिंदुस्थानने ‘अग्निपथ’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे सैन्यदलातील कार्यकाळ कमी झाला असून निवृत्तीवेतन आणि इतर सुविधाही मिळणार नाहीत. त्यामुळे या योजनेवर नाराजी व्यक्त करत नेपाळने सैन्यभरती प्रक्रियेची 200 वर्षे जुनी परंपरा खंडित केली आहे. वॅग्नर ग्रुपकडून सैनिकांना चांगला पगार आणि भत्ते दिले जातात. एका वॅग्नर सैनिकाला जवळपास 2,500 डॉलरपर्यंत (हिंदुस्थानी रुपयांमध्ये 2.04 लाख) पगार मिळतो. रशियातील इतर क्षेत्रांतील नोकरदाराची तुलना केल्यास सरासरी पगार एक हजार डॉलरपर्यंत (81 हजार रुपये) मिळत असल्याचे समोर आले आहे. यासाठीच नेपाळी युवक रशियाची वाट धरत आहे.

नेपाळी गोरखा-रशिया संबंधाकडे हिंदुस्थानने गांभीर्याने पाहिले आहे. जे युवक खासगी सैन्यदलात काम करून आले आहेत आणि ते युवक अग्निवीर प्रक्रियेद्वारा हिंदुस्थानी सैन्यामध्ये भरतीसाठी आले तर त्यांना अर्थातच भरती केले जाऊ नये.

अग्निवीर भरती सुरू झाल्यानंतर नेपाळ सरकार/नेपाळी गुरखा अतिशय नाखूश होते. त्यांना केवळ चार वर्षांकरिता हिंदुस्थानी सैन्यामध्ये प्रवेश नको होता. पहिल्याप्रमाणे पेन्शन देणारी भरती पाहिजे होती. आताच नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी ही मागणी पुन्हा एकदा भारत सरकारसमोर मांडली, परंतु ही मागणी अमान्य झाली. कारण पेन्शन देणे सरकारला परवडणारे नाही. यानंतर काही हिंदुस्थानी राजकीय पक्षांनी, गोरखा रेजिमेंटच्या काही भूतपूर्व अधिकाऱ्यांनी हीच मागणी केली आहे.

मात्र जर नेपाळी गुरखा रशियामध्ये गेले किंवा रशियाच्या बाजूने लढण्याकरिता आफ्रिकेत गेले तर यामुळे हिंदुस्थानला फारसा धोका निर्माण होऊ शकत नाही. नेपाळी गुरखा जर रशियात जात असतील तर त्यांना आपण थांबवू शकत नाही. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये नेपाळी गुरख्यांना चिनी सैन्यांमध्ये प्रवेश करू देऊ नये. कारण तो हिंदुस्थानकरिता मोठा धोका असेल.

[email protected]