पाठारे प्रभूंची खवय्येगिरी

>> रश्मा नवलकर

पाठारे प्रभू किती आवडीने विविध प्रकारचे पदार्थ बनवतात चवीने खातात! ही खाद्य संस्कृती बघता अभिमानाने
बोलू शकतो, ‘आम्ही सारे खवय्ये!’

थंडीच्या दिवसांत  भाज्या मुबलक  मिळतात. या सर्व भाज्या म्हणजे वांगी, कांदा, बटाटेपापडय़ा, घेवडा, गाजर, सुरण, रताळी, कसरा, ऊस, कांदापात, कोनफळ, राजेळी केळी या भाज्यांचा घडा बनवतात. मांसाहारी घडय़ामध्ये घोळ, कोळंबी, मटण घालतात. या घडा भाजीबरोबर चुरमे लाडू किंवा सांजोरी खाल्ली जाते.

उन्हाळा सुरू झाला की, लोणची आणि मुरांबे तर होतातच, पण घरगुती पावही बनवला जातो. या पावाचे वैशिष्टय़ म्हणजे बटाटा चणाडाळीचे घरगुती यीस्ट बनवून हा पाव तयार होतो अणि तो आमरसाबरोबर खाल्ला जातो.

मुंबईचे आद्य रहिवासी पाठारे प्रभू हे खाण्याचे शौकीन म्हणून ओळखले जातात. पिढय़ान्पिढय़ांपासून चालत आलेली खाण्याची आवड आजतागायत जोपासली गेली आहे. विशेष म्हणजे पाठारे प्रभूंचे पदार्थ सध्या कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार नाहीत, पण घरोघरी विविध प्रसंगी, सणावारी विशिष्ट पदार्थ बनत असतात. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बहुतेक पदार्थ झटपट बनतात. नारळाचे किंवा इतर प्रकारचे वाटण फार कमी प्रमाणात असते आणि सर्व पदार्थांना चविष्ट बनवणारे मुख्य घटक म्हणजे पाठारे प्रभू सांबार मसाला. जो 20-25 खडय़ा मसाल्यांपासून बनवला जातो व लाल मेतकूट मसाला, जो पदार्थाला लोणच्यासारखी चव आणतो.

मांसाहार जरा जास्तच प्रिय असलेले प्रभू कांदापोह्यात करंदी घालतात, वांग्यात मटण खिमा भरतात, कोबीच्या भानोळय़ात व शेवळाच्या सांबाऱ्यात कोळंबी घालतात, अळूवडी ज्याला पातवड म्हणतात, त्यात कोळंबी किंवा खिमा घालतात आणि राजेळी केळी व ओल्या बोंबलाचे मुंबरे करतात. सरंग्याचे भुजणे, चिंबोरीचे खडखडले, कोळंबीचे आटले, ताजल्यातले किंवा गोडे मटण, कोळंबीचे हिरवे कालवण अशा खास नावाचे पदार्थ सर्व प्रभूंच्या घरात सर्रास बनत असतात.

शाकाहारी पदार्थांमध्येही तेवढेच वैविध्य आहे. बटाटय़ाचे/वालाचे भुजणे, अननसाचे सांबारे, गोडी बटाटी, हिंगतेलाची बटाटी, कोवळ, टोमॅटो शीर, शिराळा वटाणा भाजी, वांग्याचे भरीत, कापटी हेही तेवढय़ाच आवडीने खाल्ले जातात. तिखटाबरोबर गोडही पाहिजेच. रवा रोट, केरोळय़ा, गुरवळय़ा, काकडीची तवसाळी, दिवाळीत मथलेले बेसन लाडू, राघवदास लाडू, सोयीच्या व दुधी हलव्याच्या शिंगडय़ा, पाडव्याला केशरी भात असे तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ पाठारे प्रभूंना प्रिय आहेत. उपवासाच्या दिवशी शिंगाडय़ाच्या पुऱ्या, हलवा, राजेळी केळय़ाचा काचरा, रताळय़ाचा कीस, तांदळाची खीर असे पदार्थ आवर्जून केले जातात. कोनफळाचे पॅटीस तर वैशिष्टय़पूर्ण असतात. श्रावणात तर शनिवारी व सोमवारी शाकाहारी मेजवानीच असते. तांदूळ उडदाचे वडे, चटणी, उंबर, वटाणा खिचडी, मठ्ठा, अळवाचे मेथे, काकडीच्या कणीची शाक, उंबर, ऐरोळी, आयतोली, पातवड, सांजोऱ्या, अप्पे, तेलपोळी, राजेळी केळी, काजू, खजूर व बदामाच्या पोळय़ा या पाठारे प्रभूंच्या खास आवडीच्या. कोजागिरी पौर्णिमेला मसाले दुधाबरोबर कांदा, बटाटे, फ्लॉवर, मिरची, मायाळू पाने, कोळंबी, सरंगा इत्यादी सर्व प्रकारची भजी फस्त केली जाते.

लग्नाचे जेवणसुद्धा तेवढेच लज्जतदार असते. सागू पुरी, चवळय़ाची भाजी, गोडी बटाटी, अननसाचे सांबारे, बटाटा/वांगी भजी, मसाले भात, पंचामृत, लोणचे, पापड, चटणी असे सुग्रास पदार्थ ताटाची शोभा वाढवतात. आजच्या बुफे जेवण पद्धतीच्या काळात असे पंगतीतले भरलेले ताट सर्वांना हवेहवेसे वाटते.