प्लेलिस्ट – वाल्ट्झमय गाणी

>> हर्षवर्धन दातार

वाल्ट्झ हा तरंगणारा नृत्य प्रकार आपल्याला समुद्रातील लाटांची, आकाशात एका लयीत वरखाली उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याची किंवा कॅनव्हासवर ब्रशने रंगाचे ‘स्ट्रोक्स’ मारणाऱ्या चित्रकाराच्या लयीची अनुभूती देतो. गाण्यांतून अशीच अनुभूती देणाऱ्या वाल्ट्झची लय पुन्हा एकदा.

स्त्री आणि पुरुषांनी एकत्र करायचा आणि अनेक आवृत्त्या असलेला वाल्ट्झ हा एक रोमँटिक नृत्य प्रकार. बघायला अतिशय लोभस अशा या लोकप्रिय नृत्य-संगीत लयीचा इतर काही संगीतकारांच्या रचनांतून वेध घेऊया.

1950च्या दशकातील एक लोकप्रिय संगीतकार जोडी हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेलं ‘काफिला’मधलं (1952) चक्क किशोर कुमारने खर्जात आणि संथ स्वरात गायलेलं ‘वो मेरी तरफ चले आ रहे है’ हे अगदी सुरुवातीच्या काळातील मालगुंजी रागातील वाल्ट्झ गीत. गाण्याचा व्हिडीओ उपलब्ध नाही. ‘नौशेरवाने आदिल’ (1957) या ऐतिहासिक चित्रपटात सी.रामचंद्र संगीतबद्ध आणि लता-रफी यांचे ‘भूल जाये सारे गम’ हे अवीट गोडीचे वाल्टझ गाणे. संगीतकार मदन मोहनने ‘वो कौन थी’ (1964) या एकाच गूढपटात दोन वाल्ट्झ आधारित गाणी दिली. सहनायिका परवीन चौधरीवर चित्रित बर्फाच्छादित स्केटिंग रिंगमधील ‘शोख नजर की बिजलियां’ आणि ‘लग जा गले’ हे साधनावर चित्रित गाजलेले गाणे. ‘दिल्ली का ठग’ (1958) यात संगीतकार रवी यांनी किशोर-आशा यांच्या स्वरात ‘ये रातें ये मौसम नदी का किनारा’ गाऊन घेतले. पडद्यावर रात्रीच्या चंद्रप्रकाशात लोभस दिसणारी नूतन आणि खुद्द किशोर. रोशन सुपुत्र राजेश रोशननेसुद्धा ‘ज्युली’मधील (1975) ‘ये राते नयी पुरानी’ आणि ‘स्वर्ग नरक’मध्ये (1978) ‘लीना ओ लीना’ ही दोन्ही ‘पार्टी गाणी’ वाल्ट्झ तालावर घेतली. पहाडी रागावर चाली बांधण्याकरिता प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं ‘फिर सुबह होगी’मधील (1958) मुकेश -आशा भोसले यांचं ‘वो सुबह कभी तो आयेगी.’

हिंदीत जास्त काम नसलेल्या मुकुल रॉय यांच्या ‘डिटेक्टिव्ह’मध्ये (1958)  हेमंत कुमार-गीता दत्त जोडीचं ‘मुझको तुम जो मिल गये’. संगीतकार चित्रगुप्तने औलादमध्ये (1968) रफी-आशाकडून ‘ये पर्बतो के दायरे’ हे गाऊन घेतले, तर याच वर्षी 60 आणि 70 च्या दशकांतील लोकप्रिय जोडी कल्याणजी-आनंदजी संगीतकार जोडीने ‘घर घर की कहानी’  चित्रपटात किशोर कुमारचे ‘समां है सुहाना’ हे पार्टी गाणं चरित्र अभिनेता जलाल आगावर चित्रित केलं. सब कुछ किशोर कुमार म्हणजे ‘झुमरू’मधील (1960) ‘ठंडी हवा ये चांदनी सुहानी’. मजरूह सुलतानपुरीच्या शब्दांत शांत आणि सुंदर निसर्गाचे वर्णन वाल्ट्झ ठेक्यावर आपल्याला मोहित करते.

लक्ष्मीकांत प्यारेलाल-नाना पाटेकरच्या ‘प्रहार’मध्ये ‘धडकन जरा रुक गयी है’मध्ये आदेश श्रीवास्तव व्हायोलिन वाजवत गाणं म्हणतो आणि गौतम जोगळेकर-माधुरी दीक्षित वाल्ट्झ नृत्य करतात. ‘मेरा नाम जोकर’चे अपयश धुऊन काढण्याकरिता ऋषी कपूरचे आणि आर. के. बॅनरवर प्रथमच संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे पदार्पण असलेल्या राज कपूरच्या ‘बॉबी’मध्ये (1973) शैलेंद्र सिंगच्या आवाजात ‘मैं शायर तो नही’ हे वाल्ट्झ गाणं. अरुणा इराणीचे सफाईदार नृत्य आणि पार्टीचं वातावरण सुरेख टिपताना व्हायोलिन्स, अकार्डियन आणि गिटारचा सुंदर उपयोग. साहिर-एलपी जोडीचे केवळ सात चित्रपट आहेत. त्यातील एक यश चोप्रांच्या ‘दाग’ (1973) या प्रेमाचा त्रिकोण असलेल्या चित्रपटात एक अतिशय रोमँटिक ‘हम और तुम’  हे किशोर -लताचं युगुल गीत. प्रेमात आकंठ बुडालेले राजेश खन्ना-शर्मिला बर्फाच्छादित परिसरात आणि साहिरचे शब्द ‘जैसे किसी संगम पर मिल जाये दो नदियां तनहा बेहते बेहते.’ सलीम-जावेद यांचा उमेदवारीच्या काळातला प्राणिविशेष चित्रपट ‘हाथी मेरे साथी’ (1971). संतूर, गिटार, सॅक्सोफोन आणि फ्लूट अशा भरगच्च वाद्यमेळाने सजलेलं ‘दिलबर जानी’. ‘शागीर्द’ (1967) या गाजलेल्या संगीतप्रधान चित्रपटात रफी-लताचं एक अतिशय सुरेल वाल्ट्झ गीत आहे, ‘वो है जरा खफा खफा.’ गिटार आणि ड्रम्सबरोबर आलाप आणि दोघांचा ‘व्हॉईसओव्हर लॅप’ या गाण्याची शोभा वाढवतो.  पडद्यावर जॉय मुखर्जी-सायरा बानूची मिश्कील जोडी. सायरा बानूने आपल्या अल्लड भोळसट ‘गांव की छोरी’ भूमिकेतून स्त्राrसुलभ नखरा तसेच नजाकत उत्तम वठवली आहे.

भव्य वाद्यमेळाचा अंतर्भाव करणाऱ्या शंकर-जयकिशननी वाल्ट्झचा भरपूर वापर आपल्या रचनांमधून केला. प्राण, अजित आणि मीनाकुमारी यांच्या भूमिका असलेल्या ‘हलाकू’मधील (1956) रफी-लताचं ‘आजा के इंतजार मे’ अतिशय भावपूर्ण आणि कर्णप्रिय गाणं. एल्विस प्रिस्लेच्या ‘मार्गारिटा’ चालीवर आधारित ‘कौन है जो सपनो मे आया’ हे ‘झुक गया आसमान’ (1968) चित्रपटातील गीत. प्रियाबरोबरच्या (सायरा बानो) भेटीची स्वप्ने बघणारा आणि पुढे काय अघटित होणार आहे याची कल्पनाही नसणारा मस्तमौला संजय (राजेंद्र कुमार) जीप चालवत हे गाणं म्हणतो. ‘ब्रह्मचारी’मधील (1968) जवळ जवळ दोन मिनिटांचं प्रील्यूड असलेलं आणि पियानो वाजवत ‘बसलेल्या’ शम्मी कपूरवर चित्रित ‘दिल के झरोखे मे बिठाकर’. सब कुछ ‘कपूर’ ‘कल आज और कल’ (1971) या चित्रपटात तीन पिढय़ांची जीवनशैली आणि मूल्यांवर आधारित वैचारिक संघर्ष दाखवला आहे. यात रणधीर-बबिता या खऱ्या आयुष्यातील जोडप्यावर चित्रित ‘भंवरे की गुंजन’ हे वाल्टझी अनुनय गीत. राज कपूर – नूतन आणि शंकर जयकिशन – मुकेश या वलयांकित जोडीच्या प्रयत्नांनी प्रसिद्ध झालेल्या ‘अनाडी’ (1959) चित्रपटात ‘दिल कि नजर से’. ही सर्व गाणी वाल्ट्झमय आहेत. जीवनाचं तत्त्वज्ञान एका जोकरच्या आयुष्यातून सांगणाऱ्या ‘मेरा नाम जोकर’मधील (1970) मुकेश यांचे अकार्डियनचे सूर आणि वाल्ट्झ तालाची जुगलबंदी असलेलं ‘जीना यहाँ मरना यहाँ’. शैलेंद्र यांचं हे गाणं पूर्ण केलं त्यांच्या पश्चात मुलगा शैली शैलेंद्र याने. ‘जुर्म’मध्ये (1990) विनोद खन्ना – मीनाक्षी शेषाद्रीवर चित्रित ‘जब कोई बात बिगड जाये’ हे गाणं 60 च्या दशकातील प्रसिद्ध ‘500 माइल्स’ या गाण्याच्या चालीवर आधारित आहे.

शाहरुख खानचा आवडता चित्रपट ‘कभी हां कभी ना’ (1994). त्यात मजरूह-जतीन-ललित आणि कुमार सानूचं ‘ऐ काश के हम होश में अब आने न पाये’ हेसुद्धा वाल्ट्झ गीत आहे. सुनील (शाहरुख) आणि अॅना (सुचित्रा) गोव्याच्या कार्निवलची मजा अनुभवताना हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजतं. पूनम (1981) चित्रपटात उद्विग्न आणि निराश राज बब्बरवर चित्रित ‘आ जरा मेरे हमनशीन’ हे अन्नू मलिक यांनी स्वरबद्ध केलेलं आणि रफी साहेबांचं शेवटच्या काळातील एक पार्टी वाल्ट्झ गाणं. पुढे अन्नू मालिकने हीच चाल ‘करीब’ (1998) चित्रपटात ‘चोरी चोरी जब नजरे मिली’ या कुमार सानू-संजीवनीने गायलेल्या गाण्यात वापरली

हिंदी चित्रपट गीतांतून वाल्ट्झ हा नृत्य-संगीत आविष्कार केवळ जोडप्यांचा नृत्य प्रकार नसून त्याची अनेक रूपं आपल्याला दिसतात. एक हात हातात, तर एक खांद्यावर अशा जवळीक साधण्याच्या या युगुल नृत्य प्रकारामुळे सुरुवातीला विरोध आणि पुढे त्याच कारणामुळे लोकप्रिय झालेला अनोखा वाल्ट्झ पुढेही संगीत रसिकांच्या मनावर राज्य करत राहील.

 (लेखक संगीत अभ्यासक आहेत.)