साय-फाय – सूर्यग्रहण आणि प्राणीजगत

>> प्रसाद ताम्हणकर

खूप दिवसांपासून चर्चेत असलेले सूर्यग्रहण एकदाचे पार पडले. अमेरिकेच्या काही भागांत पूर्ण सूर्यग्रहणामुळे काही मिनिटांसाठी पूर्णपणे अंधार पसरला होता. जगभरातील अनेकांनी या खगोलीय चमत्काराचा आनंद लुटला. तज्ञांनी त्यांच्या अभ्यासासाठी या ग्रहणाचा वेध घेतला. मात्र या ग्रहणाच्या निमित्ताने एक वेगळ्या चर्चेने जोर पकडला आहे. ज्याप्रमाणे मानव या ग्रहणाकडे बघतो, आश्चर्य व्यक्त करतो, कधी भांबावतो तसे प्राणीजगतातील इतर जनावरांच्या वर्तनातदेखील फरक आढळतो का?

जगभरात काही शास्त्रज्ञ या प्रश्नावर संशोधन करत आहेत. मात्र अनेकांना हा प्रश्न फार पूर्वीपासून पडलेला आहे. विल्यम व्हीलर या इंग्लंडमधील कीटकशास्त्रज्ञाने 1932 साली झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी स्थानिक वृत्तपत्रात जाहिराती दिल्या आणि लोकांना आवाहन केले की, त्यांनी ग्रहणकाळात आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांवर काय परिणाम होतो त्याची नोंद करावी आणि त्याच्यापर्यंत पोहोचवावी. त्यावेळी त्याला लोकांकडून 500 नोंदी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती अशा विविध नोंदी होत्या. यामध्ये ग्रहणात अंधार झाल्याबरोबर घुबडे ओरडू लागली, मधमाश्या आपल्या पोळ्याकडे परतल्या अशा नोंदी होत्या.

2017 साली ग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञांना असेच धक्कादायक अनुभव मिळाले. ग्रहण लागताच अर्थात अंधार पडताच जिराफ घाबरून पळायला लागले. मधमाश्यांनी गुणगुणणे बंद केले, साऊथ कॅरोलिना इथल्या प्राणिसंग्रहालयात तर कासवांनी मिलनाला सुरुवात केली. विशेष म्हणजे 2017 साली ग्रहणाच्या वेळी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असे काही शास्त्रज्ञांचे मत होते. मात्र चित्र काही वेगळेच दिसले. दक्षिण कॅरोलिनामधील प्राणिसंग्रहालयातील दोन तृतीयांश प्राण्यांचे वर्तन ‘आश्चर्यकारक’ होते अशी त्यांनी नोंद केली आहे. त्यांनी या प्राण्यांची विविध गटांत विभागणी केली. असे प्राणी ज्यांनी त्यांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवले, असे प्राणी ज्यांनी संध्याकाळ झाल्याचे समजून आपले व्यवहार सुरू केले आणि असे प्राणी ज्यांच्या वर्तनात या काळात विचित्र फरक पडला.

सूर्यग्रहणाच्या पूर्ण काळात ग्रिझली अस्वलासारखे प्राणी अत्यंत निराश अवस्थेत होते. काही निशाचर पक्ष्यांची अवस्था पूर्णपणे संभ्रमित झाल्यासारखी झाली होती. काही प्राणी निराशा आणि चिंताग्रस्त अवस्थेची लक्षणे दाखवायला लागले. जिराफसारखा शांत प्रवृत्तीचा प्राणीदेखील कावराबावरा होऊन धावताना दिसला. सर्वात महत्त्वाची नोंद गॅलापागोस या महाकाय कासवांच्या बाबतीत घेण्यात आली. ही कासवे तशी सुस्त प्रवृत्तीची म्हणून ओळखली जातात आणि शक्यतो कोपऱ्यात सुस्तावलेली असतात. मात्र ग्रहणकाळात ही कासवे प्रचंड सक्रिय झाली होती आणि जोडीदाराशी मिलनासाठी आतुर झालेली दिसली. मात्र या सर्व नोंदीमध्ये काही त्रुटीदेखील असण्याची शक्यता आहे. कारण ग्रहण काळात प्राण्यांना पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लोक जमा झाले होते आणि ते प्रचंड गोंगाट करत होते. त्यामुळे प्राण्यांच्या वर्तनात झालेले परिणाम हे सूर्यग्रहणामुळे झाले की लोकांच्या गोंगाटामुळे, याबद्दल शंका व्यक्त केली जाते.

मोकळ्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांवर, किडय़ांवर ग्रहणाचा काय परिणाम होतो याचादेखील अभ्यास करण्यात आला. ग्रहण काळातील अंधारात आकाशात पक्ष्यांची नोंद करणे अवघड असल्याने, या कामासाठी विविध हवामान केंद्रांची निवड करण्यात आली. यासाठी रडार्स तसेच सिग्नल्सची मदत घेतली गेली. संध्याकाळी पक्ष्यांच्या हालचाली अधिक जाणवतात, कारण सूर्यास्ताच्या वेळी पक्षी आपापल्या घरटय़ाकडे परतत असतात. मात्र दिवसाच्या काळात अचानक अंधार झाला, तर या पक्ष्यांची प्रतिक्रिया काय असेल ही मोठी उत्सुकता होती. ग्रहणकाळात पक्ष्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले. या काळात बहुतांश पक्षी आकाशातून खाली उतरले होते आणि त्यांनी इकडे-तिकडे उडणेदेखील थांबवले होते. शास्त्रज्ञांच्या एका सिद्धांतानुसार पक्ष्यांचे असे वर्तन हे वादळापूर्वीच्या वर्तनाशी साम्य दाखवणारे होते.

या महिन्यात झालेल्या सूर्यग्रहणाच्या काळातदेखील विविध नोंदी करण्यात आलेल्या आहेत. त्या नोंदींचा अभ्यास पूर्ण झाल्यावर काही नवे खुलासे, माहिती मिळते का, हे पाहणे रंजक असणार आहे.

[email protected]