ठसा – डॉ. अरुणा ढेरे

>> मेधा पालकर

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (पै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे. येत्या 15 जुलैला त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. तीन दशकांहून अधिक काळ व्रतस्थ वृत्तीने आणि निष्ठेने डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचार जागर केला.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ. ढेरे यांच्याविषयी विशेष आपुलकी होती. मराठी साहित्य विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान असलेल्या डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे या संशोधक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र चिंतामणी ढेरे व इंदुबाला रामचंद्र ढेरे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. डॉ.अरुणा ढेरे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा, गरवारे व सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे झाले. 1977 साली त्या बीएला मराठी विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आल्या आणि त्यांनी सुवर्ण पदकासहित अकरा पारितोषिके मिळवली. 1979 साली एमएलाही मराठी विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आणि तेरा पारितोषिके पटकावली. 1977 साली त्यांनी भारतीय विद्या पदविका प्राप्त केली, तीही टिळक विद्यापीठात सर्वप्रथम येऊन आणि यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळवून. 1986 साली पुणे विद्यापीठात डॉ.भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबऱयांचा आदिबंधात्मक अभ्यास’ (जी.ए.कुलकर्णी आणि चिं.त्र्यं.खानोलकर यांच्या विशेष संदर्भात) या विषयावर प्रबंध लेखन करून त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी मिळविली. 1983 ते 1988 या काळात पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन पेंद्रात अध्यापक-निर्माती म्हणून त्यांनी काम केले. 1989 ते 1991 दरम्यान राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य-विभागप्रमुख आणि ‘पसाय’ या मासिकाची संपादिका म्हणून काम केले. त्यानंतर मात्र आजतागायत त्या पूर्णवेळ लेखन आणि संशोधन कार्य करीत आहेत. लेखन-संशोधन हेच जीवितकार्य मानणाऱ्या व्रतस्थ वृत्तीच्या वडिलांनी त्यांना घरातच पुस्तकांचे ज्ञान भांडार लहान वयापासून दाखवले. समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास त्यांनी केला. तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली. दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व जाणले. आपली स्वतंत्र प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी काव्य, कथा, कादंबरी इत्यादी सर्व लेखनातून परंपरेतील सत्त्व आणि नवतेतील सामर्थ्य प्रकट केलेले दिसते. त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचा असला तरी कवितेबरोबरच कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. संपादनही केले आहे. ‘भगव्या वाटा’, ‘कृष्णकिनारा’, ‘नागमंडल’, ‘अज्ञात झऱयावर रात्री’ अशा कथांमधून मानवी जीवनातील विविध नातेसंबंध आणि मानवी वर्तन यांमागची मानसिकता उलगडून दाखविताना त्यांची चिंतनशीलता दिसून येते.‘रूपोत्सव’, ‘मनातलं आभाळ’, ‘लावण्ययात्रा’, ‘काळोख आणि ‘पाणी’ यांसारख्या ललित लेखसंग्रहांतून सृष्टीच्या निर्मितीची, जीवनसृष्टीच्या आविष्काराची संवेदनात्मकता जाणवते. याशिवाय, त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीची साक्ष पटवणारे ‘विस्मृती चित्रे’ हे पुस्तक होय. महाराष्ट्र शासनाचे तसेच विविध मान्यवर संस्थांचे अनेक पुरस्कार डॉ.अरुणा ढेरे यांना मिळालेले आहेत. त्यांमध्ये ‘लावण्ययात्रा’ला मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, ‘मंत्राक्षर’ला मिळालेला ‘बालकवी’ पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मिळालेले कवी ‘यशवंत’ व ‘ह.श्री.शेणोलीकर’ पारितोषिक, एकूण वाङ्मयीन कार्याकरिता मिळालेले पुरस्कार, ‘सुंदर हे जग’ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, हे उल्लेखनीय पुरस्कार होत. स्वतंत्र प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी काव्य, कथा, कादंबरी इत्यादी सर्व लेखनांतून परंपरेतील सत्त्व आणि नवतेतील सामर्थ्य प्रकट केलेले दिसते. त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचा असला तरी कवितेबरोबरच कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार हाताळले आहेत.