CAA चा निर्णय म्हणजे भाजपचे वोटबँकेचे राजकारण; अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) लागू झाल्यानंतर देशातले राजकारण तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सीएएचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याने सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका होत आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीएए लागू करण्यास तीव्र विरोध केला आहे. तसेच भाजपवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भाजपची देशात सत्ता आहे. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने सीएए लागू केला आहे. आपल्या हक्काच्या घरांमध्ये भाजप पाकिस्तानी नागरिकांना वसवणार आहे. केंद्र सरकारचा जो सरकारी पैसा आपल्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी खर्च करायला हवा, तो पैसा आता पाकिस्तानी नागरिकांना देशात वसवण्यासाठी खर्च केला जाईल. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये जवळपास अडीच ते तीन कोटी अल्पसंख्याक आहेत. हे तिन्ही देश अतिशय गरीब आहेत. हिंदुस्थानची कवाडे उघडताच या तीन देशांमधून गर्दीचे लोंढेच लोंढे आपल्या देशात येतील. या अडीच ते तीन कोटी अल्पसंख्याकांपैकी दीड कोटी नागरिक जरी हिंदुस्थानात आले तरी यांना रोजगार कोण देणार? त्यांना कुठे वसवले जाणार? भाजपवाले यांना आपल्या घरात घेणार का, त्यांना घरात ठेवतील का? भाजपवाले त्यांना रोजगार देणार का? असा तिखट सवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे.

भाजपने सीएए का आणला?

भाजप असे का करतोय? हा खरा प्रश्न आहे. हा संपूर्ण खेळ म्हणजे वोटबँक उभारण्याचे गलिच्छ राजकारण आहे. तीन देशांमधून दीड ते दोन कोटी नागरिक हिंदुस्थानात आल्यास त्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ठरवून वसवण्यात येईल. जिथे-जिथे भाजपची मतं कमी आहेत, अशा ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करून तिथे भाजपची पक्की वोटबँक तयार केली जाईल. यातून भाजपच्या मतांची संख्या वाढेल. या निवडणुकीत नाही. पण पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकतो, असे काही लोक सांगत आहे. हे खरे आहे की खोटे? मला माहिती नाही. पण सर्वांत मोठा प्रश्न हा आहे की, भाजप हे का करतो आहे? असे म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घणाघात केला आहे.

‘भाजपवाले जगाच्या उलट’

आपल्या देशातील नागरिकांना रोजगार मिळत नाहीये. पण भाजप पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थानात आणून त्यांच्या मुलांना रोजगार देणार आहेत का? हे समजण्याच्या पलिकडे आहे. भाजपवाले जगाच्या उलटे काम करत आहेत. कोणताच देश शेजारी देशातील गरीबांना आपल्या देशात घेण्यास तयार नाही. यासाठी अनेक देश कठोर कायदे आणि सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवत आहेत. विजेच्या तारांचे कुंपण घातले जात आहे. जेणे करून शेजारी देशातील नागरिक घुसखोरी करू नये. पण भाजप एकच असा पक्ष आहे, जो शेजारी देशांतील गरीबांना आपल्या देशात घुसवण्यासाठी दरवाजे उघडे करत आहे. हे जगाच्या उलटे काम सुरू आहे, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.