अशोक चव्हाणांच्या सभेसाठी मराठा आंदोलकांना डांबून ठेवले! अर्धापुरात पोलिसांची मिंधेगिरी

भाजपचे ‘आदर्श डीलर’ खासदार अशोक चव्हाण यांना होणार्‍या मराठा आंदोलकांच्या विरोधाचा पोलिसांनी भलताच धसका घेतला! चव्हाणांची पिंपळगाव येथील सभा निर्धोक होण्यासाठी अर्धापूर पोलिसांनी चक्क मराठा आंदोलकांना दिवसभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. पोलिसी मोगलाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी चव्हाणांच्या सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाजपचे गुणगान गाण्याची वेळ अशोक चव्हाणांवर आली.

भाजपने आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करताच अशोक चव्हाण यांनी क्षणाचाही वेळ न दवडता काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी राज्यसभा पदरी पाडून घेतली. अशोक चव्हाणांच्या या पलटूगिरीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असतानाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्येही त्यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे.

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे ग्रामस्थांनी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याची सभा होऊ देणार नाही, असा ठराव केला आहे. याच पिंपळगावमध्ये सोमवारी अशोक चव्हाणांची सभा ठेवण्यात आली होती. सभेच्या 48 तास अगोदर अर्धापूर पोलिसांनी गावातील 30 ते 35 मराठा आंदोलकांना कलम 149 अन्वये स्थानबद्धतेची नोटीस बजावली. त्यानंतर कलम 111 अन्वये या सर्वांना अर्धापूर पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले. पोलिसांच्या या मिंधेगिरीवर रवि कल्याणकर, विठ्ठल कल्याणकर, बालासाहेब कल्याणकर आदींनी संताप व्यक्त केला. पोलिसांना हाताशी धरून, आम्हाला डांबून गावाच्या किंवा आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असेही या आंदोलकांनी ठणकावून सांगितले.

मराठा आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवल्यानंतर भाजपचे खासदार पिंपळगावात आले. मात्र पोलिसांच्या रझाकारीचा निषेध करत गावाने त्यांच्या सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांसमोर अशोक चव्हाणांनी भाजपचे भजन गायले. अशोक चव्हाण गावातून बाहेर पडल्यानंतरच पोलिसांनी मराठा आंदोलकांना सोडले.