हिंदुस्थानी नेमबाजांची कमाल, दोन सुवर्णांसह आठ पदकांची लयलूट

हिंदुस्थानी नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी कमाल केली. त्यांनी 2 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 8 पदकांची लयलूट करीत बुधवारचा दिवस गाजविला. आता चौथ्या दिवसअखेर हिंदुस्थानच्या खात्यात 5 सुवर्ण, 7 रौप्य, तर 10 कांस्य अशी एकूण 22 पदके जमा झाली आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंचा दबदबा बघायला मिळाला. हिंदुस्थानी महिला संघाने 50 मीटर रायफल-3 पोजिशनमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत चौथ्या दिवसातील पहिले पदक जिंकले. सिफ्त सामरा, आशी चौकसे व मानिनी कोशिक या हिंदुस्थानी त्रिकुटाने हे रुपेरी यश संपादन केले. त्यानंतर थोडय़ाच वेळात हिंदुस्थानी महिला संघाने पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला. मनू भाकेर, ईशा सिंह व रिदम सांगवान या हिंदुस्थानी संघाने 25 मीटर पिस्टलमध्ये सर्वाधिक 1759 गुणांची कमाई करीत हे सोनेरी यश संपादन केले. चिनी संघाला 1756 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर दक्षिण कोरियाने 1742 गुणांसह कांस्यपदक जिंकले. त्यानंतर सिफ्त कौर सामराने 50 मीटर एअर रायफलमध्ये हिंदुस्थानला वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने थ्री पोजिशनमध्ये विश्वविक्रम कायम ठेवत हा सुवर्णवेध साधला. सिफ्तने 469.6 गुणांसह एका स्पर्धेत आशियाई अन् जागतिक स्पर्धेतील विक्रम केला. याच नेमबाजी प्रकारात आशी चौकसे हिने 451.9 गुणांसह कांस्यपदक जिंकले. पुरुष गटात अनंत जीत सिंह नरुकाने स्कीटमध्ये वैयक्तिक रौप्यपदकाची कमाई केली.  मग 18 वर्षीय ईशा सिंहने 25 मीटर पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकले. याचबरोबर पुरुषांच्या स्कीट सांघिकमध्ये हिंदुस्थानच्या अंगद बाजवा, गुरजोत खांगुरा व अनंतजीत सिंह यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली.

हिंदुस्थानने उडविला सिंगापूरचा धुव्वा

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी सिंगापूरचा 13-0 गोलफरकाने धुव्वा उडवित आपल्या अभियानास धडाकेबाज प्रारंभ केला. यात संगीता कुमारीने गोलची हॅट्ट्रिक साजरी केली, तर नवनीत कौर हिने 2 गोल केले. संगीता कुमारीने 23 व्या, 53 व्या व 47 व्या मिनिटाला गोल केले. नवनीत कौर हिने 14 व्या मिनिटाला लागोपाठ दोन केले. याचबरोबर दीपिका, सुशीला चानू, उदिता, नेहा, दीप ग्रेस इक्का, सलीमा टेटे, वंदना  कटारिया व मोनिका यांनी हिंदुस्थानसाठी प्रत्येकी एक गोल केला. हिंदुस्थानला या लढतीत अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यातील केवळ पाच पेनल्टीवरच हिंदुस्थानी खेळाडूंना गोल करता आले. हिंदुस्थानने मध्यंतरापर्यंत 8-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर पुढील दोन क्वॉर्टरमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी पाच गोल केले. आता शुक्रवारी हिंदुस्थानची गाठ मलेशिया या देशाशी पडणार आहे.

टेनिस एकेरीत पदकाची पाटी कोरी  

हिंदुस्थानी टेनिसपटूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत एकेरीतील पदकाची पाटी कोरीच राहिली. या स्पर्धेत 2006 नंतर रिकाम्या हाती परतण्याची हिंदुस्थानची ही पहिलीच वेळ होय. सुमित नागल व मागील आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती अंकिता रैना यांना बुधवारी उपांत्यपूर्व लढतीत पराभव पत्करावा लागल्याने हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सुमित नागलला जागतिक क्रमवारीत 60 व्या स्थानी असलेल्या जिझेन झांगने 6(3)-7, 6-1, 6-2 असे पराभूत केले. ही लढत 2 तास 16 मिनिटांपर्यंत रंगली. अंकिता रैनाला जपानच्या काजी हारुका हिने 3-6, 6-4, 6-4 असे हरविले. अंकिताने पहिला सेट जिंकून झकास सुरुवात केली होती, मात्र जपानी खेळाडूने पुढील दोन्ही सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, रामकुमार रामनाथन व ऋतुजा भोसले यांना दुसऱया फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. आता पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला पदकाच्या आशा आहेत.