मणिपूरच्या बिष्णुपूरमधून ‘आसाम रायफल्स’चे जवान हटवले, महिलांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारची माघार

मणिपूरच्या बिष्णुपूर जिह्यात मोइरांग लखमाई चौकी येथे तैनात करण्यात आलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांना माघारी बोलावण्यात आले. मोठय़ा संख्येने महिलांनी सोमवारी विविध ठिकाणी रास्ता रोको केला. आंदोलन चिघळू नये म्हणून अखेर सरकारने आसाम रायफल्स हटवण्याचा निर्णय घेतला.

आसाम रायफल्सच्या जागी या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्यातील पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. विष्णुपूर जिह्यात गेल्याच आठवडय़ात पुन्हा हिंसाचार उफाळून आला होता. महिलांनी अनेक भागांत सोमवारी जोरदार आंदोलन केले आणि आसाम रायफल्सच्या जवानांना आपल्या परिसरातून हटविण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक एल. कैलून यांनी तत्काळ आसाम रायफल्सच्या जागी राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 128 तुकडया कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आल्या.

संचारबंदी शिथिल

इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिह्यात मंगळवारी संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. पहाटे 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंफाळच्या पूर्व आणि पश्चिमेकडील भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली. तर थौबल जिह्यात पहाटे 5 ते सायंकाळी 4 आणि काकचिंगमध्ये पहाटे 5 ते सायंकाळी 5 पर्यंत संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे.

आसाम रायफल्सच्या

जवानांविरोधात गुन्हा दाखल

मणिपूर पोलिसांनी आसाम राफल्सच्या जवानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विष्णुपूर जिह्यात तीन जणांच्या हत्येत सहभागी असल्याच्या आरोपाखाली काही जणांना अटक करण्यापासून आसाम रायफल्सच्या जवानांनी रोखल्याचा आरोप जवानांवर ठेवण्यात आला आहे.   विष्णुपूर जिह्यातील फौगाकचाओ इखाई पोलीस ठाण्यात आसाम रायफल्सच्या जवानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णुपूर जिह्यातील फोलजंग रोड येथे क्वाटा वॉर्ड 8 मध्ये कुतुबवाली मशिदीच्या परिसरात गेलेल्या पोलिसांनाही आसाम रायफल्सच्या जवानांनी रोखल्याचा आरोप आहे.

आसाम रायफल्स आणि पोलिसांमधील वादाचा व्हिडीओ व्हायरल

मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या जवानांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओत मणिपूर पोलीसचे कमांडो आसाम रायफल्सच्या जवानांवर ऑपरेशनमध्ये अडथळा आणल्याचा आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.