भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल, आदिवासीला शिवीगाळ करून मारहाण

भाजपचे पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि डहाणू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत आणि अन्य तीन जणांविरोधात डहाणूतील एका आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी ऍट्रोसिटी आणि अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डहाणू तालुक्यातील एंट्रीगेट नवापाडा येथील रहिवासी असलेले प्रकाश अनंत ठाकरे यांना शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता भरत बंसराज राजपूत, त्यांचा भाऊ जगदीश बंसराज राजपूत, विशाल नांदलस्कर व राजेश ठाकूर यांनी डहाणू शहरातील रामवाडी येथील कार्यालयात बोलावले. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार पीडित प्रकाश यांनी केली आहे. नोव्हेंबर 2022 साली भरत राजपूत व त्याच्या सहकाऱयांनी अरुणा भावर या आदिवासी महिलेचे अपहरण करून तिचा शोध घेणाऱया पती व कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी तक्रारी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कुठलीही कठोर कारवाई झाली नव्हती. दरम्यान, जीवाला धोका असल्याने पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी फिर्यादी प्रकाश अनंत ठाकरे यांनी डहाणू पोलिसांकडे केली आहे.