बीएडच्या विद्यार्थ्यांची फसवणूक, अभ्यासक्रमाची फी भरूनही हॉल तिकीटच मिळाले नाही

इंटिग्रेटेड क्लासच्या फसवणुकीचा फटका बीएडच्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. दादर पश्चिम येथील ऑक्टिव स्मार्ट एज्युकेशन या खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची फी भरूनदेखील परीक्षेचे हॉल तिकीट मिळालेले नाही. क्लासच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा विटावा येथील जय भगवान महाविद्यालयात बीएडसाठी प्रवेश झाला. मात्र क्लास चालकांनी महाविद्यालयात फी जमा न केल्याने त्यांचा प्रवेशच झाला नाही. हे सर्व विद्यार्थी बीएडच्या द्वितीय वर्षाचे असून त्यांना आता वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

ऑक्टिव स्मार्ट एज्युकेशन या खासगी क्लासने विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी अतिरिक्त शुल्क आकारले. हे विद्यार्थी अभ्यास क्लासमध्ये करतात आणि हजेरी व परीक्षेसाठी महाविद्यालयावर अवलंबून असतात. मागील शैक्षणिक वर्षी (2022-23) काही विद्यार्थ्यांनी क्लासच्या सहकार्याने प्रथम वर्ष बीएडकरिता भगवान महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी यंदा द्वितीय वर्ष बीएड प्रवेशासाठी दादर येथील क्लासमध्ये फी भरली. मात्र द्वितीय वर्षाच्या परीक्षा जाहीर झाल्या तरी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले नाही. युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर तसेच युवासेना विस्तारक रणजित कदम, माहीम विभाग युवा अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, युवा शाखा अधिकारी सुशांत गोजरे आणि विधानसभा चिटणीस यांनी महाविद्यालयात चौकशी केली असता या विद्यार्थ्यांचा द्वितीय वर्षासाठी प्रवेश झाला नसल्याचे सांगण्यात आले.

अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी घेऊनसुद्धा त्यांची फसवणूक करणाऱया क्लास चालकावर तसेच महाविद्यालयावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांना देण्यात आले. यावेळी कारंडे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.