भेंडवडेत राजकीय पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी, दुचाकी पेटविली; काठय़ा, दगड, धारदार शस्त्रांचा वापर

राजकीय पूर्ववैमनस्यातून भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे निकम व माने या दोन गटांत झालेल्या वादावादीतून एका दुचाकीची जाळपोळ व एकावर दगड टाकून नुकसान करण्यात आले. हाणामारीत दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर हल्ला करून बेदम मारहाण केली. या हाणामारीत दोन्ही गटांतील सहाजण गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली असून, दोन्ही गटांतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काठय़ा, दगड व शस्त्र्ाांचा वापर व जाळपोळ करून झालेल्या हाणामारीमुळे गावात वातावरण तणावमय आहे.

भेंडवडे येथे स्थानिक राजकारणात अमोल निकम व सर्जेराव माने गटांत वर्चस्ववादातून धुसफूस सुरू आहे. या पूर्ववैमनस्यातून निकम गटाचे विजय कुंभार यांच्याशी माने यांचा वाद झाला होता. भेंडवडेचे उपसरपंच हणमंत पाटील यांनी विजय कुंभार याला अभिजित सर्जेराव माने याच्या घरी नेले. तेथे अभिजित आणि विजय कुंभार यांच्यात वाद झाला. त्यावेळी अभिजित माने, संग्राम माने, बाळासाहेब माने, सुशांत पाटील, रोहन कांबळे, करण माने (सर्व रा. माळवाडी, भेंडवडे, ता. हातकणंगले) यांनी कुंभार यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी विजय कुंभार यांनी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, परगावी गेलेले निकम हे शुक्रवारी सकाळी गावात आले असता, विजय कुंभार याला मारहाण झाल्याचे व आपल्या घराकडेही माने गटाचे लोक चाल करून आल्याची माहिती मिळाली. याचा जाब विचारण्यासाठी निकम यांनी माने यांच्या घरी जात घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली. तर, माने गटातील लोकांनीही निकम गटातील लोकांना बेदम मारहाण केली. निकम गटातील बालाजी निकम व संतोष निकम यांच्यावर माने गटातील लोकांनी धारदार शस्त्र्ााने हल्ला करून जखमी केले आहे. अन्य गंभीर जखमींमध्ये ऋषिकेश कोळी, आसिफ पठाण, दशरथ देसाई, हर्षवर्धन माने यांचा समावेश आहे. यावेळी एका दुचाकीचे दगड टाकून नुकसान केले, तर दुसरी पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.