‘बिद्री’च्या निवडणुकीत सत्ताधारीच ‘लई भारी’, के. पी. पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार विजयी

कोल्हापूर जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला. सत्ताधारी आघाडीचे सर्व 25 उमेदवार 5 ते 6 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले.

कागल, राधानगरी, भूदरगड व करवीर या चार तालुक्यांतील 212 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 3 डिसेंबर रोजी प्रचंड चुरशीने 25 जागांसाठी 56 हजार 91 मतदानापैकी 49 हजार 940 (89.03 टक्के) मतदान झाले होते. मंगळवारी (दि. 5) सकाळी आठ वाजता 120 टेबलवर मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीपासूनच विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलने मोठी आघाडी घेतली, तर आमदार प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक व समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दारूण पराभव झाला.

49,940 मतांपैकी 1064 मते अवैध ठरली. दरम्यान, मतमोजणी केंद्रात जाऊ न दिल्याने काही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

विजयी उमेदवार ः

के. पी. पाटील (मुधाळ), मधुकर कुंडलिक देसाई (म्हसवे), राहुल बजरंग देसाई (गारगोटी), पंडित दत्तात्रय केणे (गंगापूर), धनाजी रामचंद्र देसाई (कडगाव), सत्यजित दिनकरराव जाधव (तिरवडे), केरबा नामदेव पाटील (पडखंबे), राजेंद्र कृष्णाजी मोरे (सरवडे), राजेंद्र पांडुरंग पाटील (सरवडे), राजेंद्र भाटळे (राधानगरी), उमेश नामदेवराव भोईटे (वाळवे), डी. एस. पाटील (मांगोली), दीपक ज्ञानदेव किल्लेदार (तिटवे), गणपतराव गुंडू फराकटे (बोरवडे), सुनीलराज सुरेश सूर्यवंशी (निढोरा), रणजित आनंदराव मुडुकशिवाले (मळगे बु.), प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील (मुरगूड), रंगराव विठ्ठल पाटील (सुरुपली), रवींद्र अण्णासा पाटील (बानगे), संभाजी पाटील (कावणे), रंजना आप्पासो पाटील (म्हाकवे), क्रांती संदीप पाटील (खानापूर), रामचंद्र शंकर कांबळे (निगवे), फिरोजखान पाटील (तुरंबे), रावसाहेब खिल्लारे (बिद्री).

बिद्रीच्या यशाचे ऊस उत्पादक शेतकरी मानकरी आहेत. सर्वाधिक ऊस दर, वेळच्यावेळी दिलेली ऊसबिले, तोडणी ओढणीची वेळेवर अदा केलेली बिले यांशिवाय कारखान्यात राबविलेले सहवीज, गाळप विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प याबाबत सभासदांचे समाधान मतमोजणीत दिसून आले. बिद्री कारखान्याला देशात लय भारी करण्याचा आपला प्रयत्न राहील. 
– के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना.