दुधाच्या 400 रुपये थकबाकीवरुन दोन गटात वाद, गोळीबारात तिघांचा मृत्यू एक जण गंभीर

बिहारच्या पटना येथे दुधाच्या पैशांच्या वादातून गोळीबार करत तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. चार जणांवर गोळ्या झाडल्या असून तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा सुरगा गावामध्य़े दुधाच्या पैशांच्या थकबाकीवरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर वाद इतका वाढला की, दोन्ही गटाच्या लोकांनी एकमेकांवर गोळीबार केला. गोळीबारात दोन्ही गटातील चार लोकांना गोळ्या लागल्या आणि तीन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पटणाचे ग्रामीण पोलीस, फतुआ डिएसपी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपासच्य़ा पोलीस पथकांचे पाचारण करण्यात आले. घटनेनंतर गावात दहशतीचे सावट पसरले होते.

घटनेबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाच्या 400 रुपयांच्या थकबाकीवरुन पंचायत होणार होती. गावातील काही लोकं यावर दोन्ही गटाकडच्या लोकांना समोरासमोर घेऊन हा वाद मिटवणार होते. मात्र त्याआधीच गुरुवारी रात्री त्यांच्यात इतका वाद झाला की, तिघांची हत्या करण्यात आली. या घटनेबाबत पटणाचे एसएसपी यांनी सांगितले की,दुधाचे पैसे थकबाकीवरुन दोन गटांमध्ये वाद झाला होता आणि त्यांनतर गोळीबार झाला. यामध्ये चार लोकांना गोळ्या लागल्या त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकाची तब्येत गंभीर आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे., शिवाय पोलीस हा जमिनीचा वादही असल्याचे बोलले जात आहे.