अय्यो!!! मसाला डोसासोबत सांबार हवाच; ग्राहकाच्या तक्रारीनंतर रेस्टॉरंटला 3,500 रुपयांचा दंड

मसाला डोसाची ऑर्डर दिली म्हणजे सांबार मिळणार हे गृहितच असतं. मात्र एका रेस्टॉरंटनं ग्राहकाला स्पेशल मसाला डोसा सोबत सांबार न देणं चांगलंच महागात पडलं आहे. बिहारमधील बक्सरमधील एका रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडाला आहे. रेस्टॉरंटमध्ये स्पेशल मसाला डोसाची किंमत 140 रुपये आहे आणि मात्र ते कमावण्याऐवजी रेस्टॉरंटला आता दंड म्हणून 3,500 रुपये मोजावे लागणार आहेत.

डोसासोबत सांबार आणि चटणी दिली जाते अशी एक पारंपारिक पद्धत आहे. मात्र स्पेशल डोसा सोबत सांबार न दिल्यानं एका ग्राहकान न्यायालयात खेचल्यानंतर रेस्टॉरंटला 3,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ग्राहक न्यायालयानं याचिकाकर्त्याला सांबार नाकारल्यामुळे झालेल्या ‘मानसिक, शारीरिक आणि आर्थिक’ त्रासाची नोंद केली आहे.

दंड भरण्यासाठी न्यायालयानं संबंधित रेस्टॉरंटला 45 दिवसांची मुदत दिली आहे. रेस्टॉरंटनं तसं न केल्यास दंडाच्या रकमेवर 8 टक्के व्याज आकारलं जाणार आहे.

ही घटना 15 ऑगस्ट 2022 ची आहे. वकील मनीष गुप्ता त्यांचा वाढदिवस साजरा करत होते. त्यांनी मसाला डोसा खाण्याचा निर्णय घेतला आणि बक्सरमधील एक रेस्टॉरंट गाठले. त्यांनी 140 रुपयांचा खास मसाला डोसा पॅक करून घेतला.

त्यानंतर कळले की साधारणपणे डोसासोबत दिले जाणारे सांबार गायब होते. रागाच्या भरात बेपत्ता झालेल्या सांबाराची विचारपूस करण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंट गाठलं.

रेस्टॉरंट मालकानं त्याच्या प्रश्नाला योग्य प्रतिसाद दिला नाही आणि म्हणाला, ‘तुम्हाला संपूर्ण रेस्टॉरंट 140 रुपयांना विकत घ्यायचे आहे का?’.

मनीषने रेस्टॉरंटला कायदेशीर नोटीस बजावली. मालकाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार केली.

11 महिन्यांनंतर, ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश सिंग आणि सदस्य वरुण कुमार यांच्या खंडपीठानं रेस्टॉरंटला दोषी ठरवलं आणि 3,500 रुपयांचा दंड ठोठावला.

‘मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास’

खंडपीठाने याचिकाकर्ते मनीष गुप्ता यांना झालेल्या ‘मानसिक, शारीरिक आणि आर्थिक’ त्रासाची नोंद केली आणि त्यांनी रेस्टॉरंटला 3,500 रुपये दंड आकारला. दंड दोन भागांमध्ये ठोठावण्यात आला – खटला खर्च म्हणून 1,500 रुपये आणि मूळ दंड म्हणून 2,000 रुपये.

न्यायालयानं सांगितलं की, जर पैसे वेळेवर दिले नाहीत तर दंडाच्या रकमेवर 8 टक्के व्याज देखील रेस्टॉरंटला भरावं लागेल.