मिंधे गटावर उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा दबाव; संजय मंडलीक, धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांचा पत्ता कट?

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे. शिवसेनेची साथ सोडून मिंधे गटात आलेल्या 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळावी असा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मात्र भाजपकडून मिंधे गटावर लोकसभेचे उमेदवार बदलण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात आहे. यात विद्यमान खासदार संजय मंडलीक, धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांचा लोकसभेला पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ठाण्यातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपने धरला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातून 32 ते 37 जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना सोडून मिंधे गटात आलेल्या 13 खासदारांची तिकिटं कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदेंनी भाजप पक्षश्रेष्ठाRना केली, पण अमित शहांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच आता भाजपने लोकसभेच्या शिंदे गटाच्या 4 जागांवर उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. यातील 2 जागा कोल्हापूर जिह्यातील असून भाजप देईल तो उमेदवार तिथून लढवावा, असा दबाव टाकला जात आहे. बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याऐवजी भाजप आमदार श्वेता महाले यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह धरला जात आहे.

नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा
– नाशिकमधून हेमंत गोडसे खासदार आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजप तसेच अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्याकडून तीव्र विरोध होत आहे. त्यातच शांतिगिरी महाराज यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरू असून गोडसे यांच्याऐवजी शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

– कोल्हापूरमधून संजय मंडलीक यांच्याऐवजी समरजीत घाडगे किंवा धनंजय महाडिक यांना लढवावे, असा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. घाटगे कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. ते भाजपचे नेते आहेत. तर महाडिक भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत.

– हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत सेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा पराभव केला. पण भाजपने माने यांच्याऐवजी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांना इथून उमेदवारी द्यावी, असा आग्रह शिंदे यांच्याकडे धरला आहे.