दामोदर हॉलच्या पाडकामाला पालिकेची स्थगिती, आयुक्तांकडे होणार निर्णायक बैठक

परळच्या ना. म. जोशी संकुलाजवळ असणाऱया सुप्रसिद्ध दामोदर नाटय़गृहाच्या पाडकामाला पालिकेने स्थगिती दिली आहे. नाटय़गृह पाडल्यानंतर 800 आसनक्षमतेच्या नाटय़गृहासह जागा विकासकाच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप नाटय़गृह बचाव समितीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतच्या निर्णयासाठी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल निर्णायक बैठक घेणार आहेत. 1 नोव्हेंबर 2023 पासून हे पाडकाम सुरू करण्यात आले होते.

या ठिकाणी नाटय़गृह, शाळा आणि मोकळे मैदान अशी वेगवेगळी आरक्षणे आहेत. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून बॉम्बे इप्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सोशल सर्व्हिस लीग या संस्थेस विशिष्ट वर्षाच्या भाडेकराराने दिली गेली होती. दामोदर हॉलच्या जागेवर नाटय़गृहाचे आरक्षण आहे. दामोदर नाटय़गृहाचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय पाडून त्या जागी सीबीएसस्सी खासगी शाळेची इमारत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी विकास आराखडय़ात आरक्षणही टाकण्यात आले आहे. या ठिकाणी केवळ 550 आसनक्षमतेचा हॉल बांधण्याचा अंदाज असून तो प्रत्यक्षात बांधण्यात येईल, याबाबतही खात्री नाही. याबाबत सहकारी मनोरंजन मंडळ, परळचे अध्यक्ष प्रमोद तांबे आणि सेक्रेटरी के. राघवकुमार यांनी उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांकडे होणाऱया बैठकीला सोशल सर्व्हिस लीग, विकासक, पालिकेच्या विकास आराखडा विभागाचे अधिकारी यांनाही बोलावण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.